आमदार काळे यांनी केली एम.आय.डी.सी. ची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तरुणाईला रोजगार उपलब्ध होवून मतदार संघाच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघात औद्योगिक केंद्र (एम.आय.डी.सी.) उभारावे अशी मागणी आशुतोष काळे यांनी राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

आशुतोष काळे यांनी नुकतीच उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेवून मतदार संघात एम.आय.डी.सी. उभारावी याबाबत त्यांना लेखी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघ अवर्षणग्रस्त असून जिरायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मतदार संघातील तरुणाच्या हाताला रोजगार नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जावे लागते. त्यामुळे मतदार संघात एम.आय.डी.सी. झाल्यास बेरोजगार तरुणाईच्या हाताला रोजगार उपलब्ध होवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

औद्योगिक केंद्र उभारण्यासाठी आवश्यक असलेली जमीन कोपरगाव मतदारसंघात उपलब्ध असून रेल्वे स्टेशन, विमानतळ, समृद्धी महामार्ग, सिन्नर-शिर्डी महामार्ग, नागपूर-मुंबई एक्स्प्रेस हायवे व प्रस्तावित सुरत-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग कोपरगाव मतदारसंघातून जात असल्यामुळे एम.आय.डी.सी. उभारण्यासाठी अनुकूल परिस्थिती कोपरगाव मतदारसंघात आहे. एम.आय.डी.सी. निर्मितीमुळे कोपरगाव मतदार संघातील तरुणांना रोजगार तर उपलब्ध होईल त्याचबरोबर मतदार संघाच्या जिरायती भागाचा आर्थिक विकास साधला जाणार आहे.

त्यामुळे एकूण परिस्थितीचा विचार करून कोपरगाव मतदार संघातील जिरायती भागात एम.आय.डी.सी. उभारण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली असून उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.