शेतकरी सहकारी संघामध्ये प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू – कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : शेतकऱ्यांना विविध सोयी-सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या देशभरातील एकूण १ लाख २५ हजार प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे (पीएमकेएस) लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या अंतर्गत कोपरगाव येथील सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघामध्ये संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लि. (इफको) चे आरजीबी विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इफको’ च्या सहकार्याने प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या केंद्रातून शेतीसाठी लागणारे खते, बी-बियाणे, कीटकनाशके आदी कृषी साहित्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान, शेतीविषयी मार्गदर्शन व इतर सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानमधील सिकर येथे गुरुवारी (२७ जुलै) देशभरातील सुमारे १ लाख २५ हजार प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील साडेआठ कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याचे वितरण, सल्फरयुक्त युरिया व इतर विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लि. (इफको) चे आरजीबी विवेक कोल्हे यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. 

गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला सक्षम करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन विविध लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नांना बळ देण्याचे मोठे काम केंद्रातील मोदी सरकार करत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू करून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शेतीच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत आवश्यक असणाऱ्या विविध बाबींची खरेदी करण्यासाठी, माती परीक्षण, अथवा शेतीविषयी माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत होते.

या केंद्रांच्या माध्यमातून या सुविधा शेतकऱ्यांना एकाच छताखालून उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक प्रयत्न केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच केला असून, त्याची देशभरात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्याअंतर्गत कोपरगाव येथील सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघामध्ये प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे महाराष्ट्रातील मॉडेल केंद्रांपैकी एक केंद्र असून, या ठिकाणी ‘इफको’ ची नॅनो युरिया, नॅनो डीएपी, कीटकनाशके व इतर उत्पादने व सोयी-सुविधांचा शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्नेहललता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी या निमित्ताने केले आहे.  

या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोपरगाव येथील सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ कार्यालयात करण्यात आले. या निमित्ताने शेतकरी मेळावाही आयोजित केला होता. यावेळी ‘इफको’ चे नगरचे विभागीय व्यवस्थापक दिनेश देसाई, क्षेत्रीय अधिकारी तुषार गोरड, सहायक निबंधक नामदेव ठोंबळ, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पंचायत समितीचे गुण नियंत्रण अधिकारी कोष्टी, श्रीमती जगताप, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक त्र्यंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, अप्पासाहेब दवंगे, नीलेश देवकर, विलासराव माळी, बापूसाहेब बारहाते, सतीश आव्हाड, संजय होन, निवृत्ती बनकर,

सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, उपाध्यक्ष बाजीराव मांजरे, संचालक संभाजीराव गावंड, विलासराव कुलकर्णी, चंद्रकांत देवकर, बबनराव निकम, नानासाहेब थोरात, रावसाहेब थोरात, राजेंद्र भाकरे, विठ्ठल कोल्हे, रामदास शिंदे, शिवाजी कदम, रघुनाथ फटांगरे, देविदास हुडे, हिरालाल गायकवाड, भागीनाथ लोंढे, प्रमिलाताई बढे, व्यवस्थापक हरिभाऊ गोरे, साई संजीवनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. सभारंजक, रामचंद्र कासार, भाऊसाहेब शिरसाठ, लक्ष्मण ठोंबरे, पोपटराव पवार, शांताराम मेहेरखांब, विजय साळुंके आदींसह शेतकरी संघाचे कर्मचारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत अंबादास देवकर व बाजीराव मांजरे यांनी तर सूत्रसंचालन हरिभाऊ गोरे यांनी केले.

‘इफको’ च्या जडणघडणीत व प्रगतीत माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून ‘इफको’ चे विभागीय व्यवस्थापक दिनेश देसाई यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांना कृषी उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान व दर्जेदार रासायनिक खते, कीटकनाशके उपलब्ध करून देणारी ‘इफको’ ही देशातील आघाडीची कंपनी आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा, शेतीसाहित्य, शेतमालाची सुरक्षितता, आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन, कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान, दळवणवळणाच्या सोयी-सुविधा आदींची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सव्वालाख ‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र’ सुरू करण्यात आले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात सुमारे ५१० ठिकाणी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राची स्थापना करण्यात आली असून, कोपरगाव तालुक्यात ७१ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. कोपरगाव येथील सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघामध्ये जिल्हा स्तरावरील प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू करण्यात आले असून, यासाठी ‘इफको’ ने मोठी मदत केली आहे. गेल्या ५६ वर्षांत ‘इफको’ ने केलेल्या प्रगतीचा आढावा घेऊन देसाई यांनी ‘इफको’ च्या द्रवरूप नॅनो युरिया व इतर उत्पादनांची माहिती दिली. कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फवारणीसाठी ‘इफको’च्या वतीने ड्रोनची सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पिकांचा विमा उतरवावा, असे आवाहन केले.