गोदावरी बायोरिफायनरीज साकरवाडीला फिकीचा पुरस्कार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथील अग्रगण्य गोदावरी बायोरिफायनरीज लि. या कंपनीला रसायन उद्योगातील पर्यावरणामध्ये विशेष योगदानाबद्दल २०२३ मधील उत्कृष्ट पर्यावरण जबाबदारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. दिल्ली येथे गुरुवारी दि. २७ जुलै २०२३ रोजी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रसायन व पेट्रोकेमिकल मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते कंपनीच्या कार्यकारी संचालीका संगीता श्रीवास्तव व साकरवाडी युनिटचे संचालक सुहास गोडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

गोदावरी बायोरिफायनरीज लि. मध्ये अद्यावत असा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आलेला असून तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. वायू प्रदूषण रोखण्याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच हरितगृह वायू, पाणी व्यवस्थापन इत्यादी मध्ये कंपनीने विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जवळपास पाच लाख वृक्षांची लागवड करून ते व्यवस्थित रित्या जोपासले आहेत.

तसेच येणाऱ्या पुढील वर्षांमध्ये अधिकचे दोन लाख वृक्ष लागवड करण्याचा कंपनीचा मानस आहे. आज रोजी या वृक्षांमुळे एका जंगलाचे स्वरूप परिसराला प्राप्त झाले आहे. ज्यामध्ये विविध प्रकारचे वृक्ष तसेच पक्षी प्राणी आढळून येतात. अधिक प्रमाणात वृक्ष लागवड व जोपासना केली असल्यामुळे परिसरातील पर्जन्यमान समाधानकारक राहण्यास मदत होत आहे. तसेच अन्न साखळी विकसित झालेली दिसून येत आहे.    

गोदावरी बायोरिफायनरीज लि. कंपनीने आपल्या स्वतःच्या संशोधन आणि विकासात आघाडी घेतली आहे. नावीन्यपूर्ण संशोधनाच्या आधारे जागतिक दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती विविध प्रकल्पांतून होत आहे. भारतीय तसेच विदेशी बाजारपेठेत या उत्पादनांचा मोठा पुरवठा हा गोदावरी बायोरिफायनरीज मधून होत आहे. रसायन उद्योगातील यशस्वी वाटचाल ही कंपनीच्या सातत्यपूर्ण अथक परिश्रमामुळे झाली आहे.

गोदावरी बायोरिफायनरीज लि. कंपनीने नावीन्यपूर्ण संशोधन आणि विस्तारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे यशस्वी वाटचाल चालू आहे. कंपनी साकरवाडी येथील आपल्या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक करीत आहे. राष्ट्रीय स्थरावरील हा पुरस्कार आमच्यासाठी गौरवास्पद आहे. याचे श्रेय आम्ही सोमैया उद्योग समूहाचे अध्यक्ष समीर सोमैया, कार्यकारी संचालीका संगीता श्रीवास्तव आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देतो, असे कंपनीचे संचालक सुहास गोडगे यांनी सांगितले.