चांगले विचार व चांगली माणसे ही संस्थेची खरी संपत्ती – हर्षदा काकडे

शेवगाव प्रतिनिधी, दि.१४ :  चांगले विचार आणि चांगली माणसे ही संस्थेची खरी संपत्ती आहे. नोकरी करताना सचोटी, प्रामाणिकपणा आणि कृतज्ञता हे फार महत्वाचे असते आणि ते जपण्याचे काम विष्णुपंत लवांडे यांनी आपल्या कार्यकाळात केले असे प्रतिपादन माजी जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांनी मंगरूळ येथे केले.

शनिवारी (दि.१३) मंगरूळ येथे निर्मलाताई काकडे माध्यमिक आश्रमशाळेचे कर्मचारी विष्णू लवांडे यांचा सेवापुर्ती सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. विदयाधर काकडे होते. 

यावेळी सरपंच संजय काकडे, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे, नवनाथ बिटाळ, रामकिसन सांगळे, यांच्यासह लवांडे यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ उपस्थित होते. काकडे म्हणाल्या, संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले तर संस्था मोठी होत असते.

चांगले कर्म आपल्या भविष्याचे साक्षीदार असतात. संस्थेतील कर्मचारी हा आमचा परिवार आहे व लवांडे हे परिवारातील महत्त्वाचे सदस्य आहेत. ते जरी शासकीय नियमाप्रमाणे सेवानिवृत्त होत असले तरी ते कायम कुटुंबातील सदस्य राहतील असेही काकडे यावेळी म्हणाल्या.

यावेळी ॲड. काकडे, अॅड.संजय काकडे, मुख्याध्यापक प्रभाकर उबाळे यांची भाषणे झाली. अनिल जगताप यांनी प्रास्ताविक केले . जयश्री लवांडे यांनी सुत्रसंचलन केले. ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी आभार मानले.