एस.एस.जी.एम.कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ : येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये भारतरत्न क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. रमेश सानप यांच्या हस्ते या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी रयतसेवकांना संबोधित करताना डॉ. सानप यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दैदिप्यमान कर्तृत्व, त्यांनी केलेले वाचन, त्यातून केलेले सत्यान्वेषण याबद्दल माहिती देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा दिला. तसेच, डॉ.आंबेडकरांनी अभ्यासपूर्वक आणि अतिशय परिश्रमाने बनविलेल्या भारतीय संविधानाचे महत्त्व सर्वांनी ध्यानी घ्यावे, असे आवाहन केले.

महाविदयालयात सांस्कृतिक व इतिहास विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मतदार जनजागृती करण्याबाबत महाविदयालयातील विदयार्थी, विदयार्थिनी कडून मतदान जनजागृती पर संकल्पपत्र भरून घेण्यात आले.

यामध्ये 445 विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमप्रसंगी महाविदयालयातील उपप्राचार्य प्रा.डॉ.उज्ज्वला भोर, प्रा.डॉ.अर्जुन भागवत, प्रा.डॉ. बाबासाहेब वर्पे, प्रा.संजय शिंदे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी- विदयार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.