कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : कला मनुष्याचे दुःख हलके करते, नॅशनल आर्टिस्ट असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीरामपुर येथील चित्रकार रवी भागवत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे संजीवनी उद्योग समूहाच्यावतीने जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या यंत्रणांना ग्रामीण भागातील कलाकारांचे महत्व पटले त्यातून रवी भागवतांची निवड सार्थ ठरली आहे.
सुप्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत यांच्याकडून चित्रकलेचे धडे घेत रवी भागवत यांनी मनापासून काम केले आणि आज ते उत्तम चित्रकार बनले आहेत. गुरु शिष्याच्या या जोड गोळीने कोरोना महामारीत कलेच्या माध्यमांतून मोठी जनजागृती केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९८ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमातूनही कलेची प्रशंसा करून त्यास प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.
चित्रकार रवी भागवत हे ऑनलाइन पद्धतीने पद्धतीने अमेरिका, कॅनडा, दुबई, जॉर्जिया, ऑस्ट्रीया, व ऑस्ट्रेलिया सह भारत देशातील ६ हजार कला प्रेमींना चित्रकलेचे प्रशिक्षण देतात ही उपलब्धी मोठी आहे. चित्रकार रवी भागवत व त्यांचे सर्व सहकारी राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयांत चित्रकला व्यंगचित्र, कॅलीग्राफी, सुंदर हस्ताक्षर आदि स्पर्धेतून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही कलेचे महत्व पटवून देतात.
अतिशय कमी वेळेत त्यांना राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली त्याचे त्यांनी सोने करावे, चित्रकलेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन व्हावे, उपेक्षीत कलाकारांच्या समस्यांची सोडवणुक व्हावी, जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याचा इतिहास आर्ट गॅलरीच्या माध्यमातून जपला जावा यासाठी नॅशनल आर्टिस्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष रवी भागवत यांनी काम करावे असेही शेवटी विवेक कोल्हे म्हणाले.