गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आग

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला काल रात्री लागलेली भीषण आग विविध ठिकाणच्या १४ आग्निशामक बंबाच्या  ८ तासाच्या अथक प्रयत्नानंतर रविवारी पहाटे ३ च्या सुमारास आटोक्यात आली. या आगीत कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पातील चार मोठया टाक्याआगीच्या भक्षस्थानी पडल्या याशिवाय उर्वरित अन्य लहान मोठ्या २५ टाक्यांना आगीची मोठी झळ पोहचली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र  वित्त हानी मोठया प्रमाणात झाली असल्याने काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असे म्हणावे लागेल.

 पाच लाख लिटर क्षमतेचा हा इथेनॉल प्रकल्प संगणीकृत स्वयंचलित असल्याने येथे मोजके कर्मचारी होते. आगीचे निश्रीत कारण समजू शकले नाही. बहूधा शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत कारखान्याचे तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर शेवगावच्या साई पुष्प रूग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आले.

     ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, मुळा, केदारेश्वर, संजीवनी या सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक बंब, पैठण, जालना व अहमदनगर एमआयडीसी विभागाचे अग्निशामक याशिवाय राहुरी, गेवराई व पाथर्डी नगरपरिषदेचे व स्वतः गंगामाई इंडस्ट्रीचे अग्निशामक दलानी आठ तास अविरत प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.

       शेवगाव तालुक्यातील नजीक बाभुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला       
काल सायंकाळी ७ च्या. सुमाराला आग लागून इथेनॉलच्या टाक्यांचा प्रचंड स्फोट झाला. टाक्यांची काही टन वजनाची झाकणे ऊडून कागदा सारखी चोळामोळा होऊन पडली. एका टाकीचे झाकण संरक्षक भिंतीवर पडल्याने भिंत पडली ! काही अंतरावर असलेल्या वसाहतीच्या इमारतीची तावदाने निखळून पडली. यावेळी भूकंप व्हावा अशी जमिन हादरली.  

आग लागताच  परिसरातील लोक जीवाच्या आकांताने बाहेर पळाले. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. कारखाना प्रशासनाने तातडीने परिसरातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हालविले. घटनास्थळी दाखल झालेल्या तहसीलदार छगनराव वाघ, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, यांनी महसूल व पोलीस विभागाच्या पथकामार्फत पैठण – शेवगाव  मार्गावरील वाहतूक काही काळ बंद केली.

       कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत मुळे, मार्गदर्शक संदीप सातपुते हे घटनास्थळी तातडीने दाखल झाले. ते रात्रभर तेथे तळ ठोकून होते. या घटनेमुळे कारखान्याचे बंद पडलेले गळीत आजच रात्री उशिरापर्यंत पुन्हा पूर्ववत सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती ने कार्यकारी संचालक विष्णु खेडेकर, प्रशासकीय अधिकारी अर्जुन मुखेकर यांनी दिली. आमदार मोनिका राजळे, केदारेश्वरचे चेअरमन अॅड.प्रतापराव ढाकणे, माजी जिप सदस्य राहुल राजळे यांचे सह अनेकांनी  रविवारी घटनास्थळी भेट देवून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.