कोपरगावच्या तहसीलदारांवर गुन्हा दाखल, परीचारीकेशी असभ्य वर्तन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारीकेशी लज्जा उत्पन्न होईल असे असभ्य वर्तन व वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोनवरून शिवीगाळ केल्या प्रकरणी कोपरगावचे दंडाधिकारी तथा तहसीलदार विजय बोरुडे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरच्या घटनेमुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दि. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास तहसीलदार बोरुडे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत प्रश्नांची सरबत्ती करत झाडाझडती घेतली होती. मात्र यावेळी कर्तव्यावर असलेल्या परीचारीकेशी असभ्य वर्तन व वैद्यकीय अधिकारी यांना अवर्च्या भाषेत शिवीगाळ केल्याचे प्रकरण नुकतेच घडले. त्याचा जिल्हा आरोग्य विभागातील संघटनांनी निषेध करत पोलीस निरीक्षकांना पत्र दिले होते. रात्री उशिरा परिचारिकेची  फिर्याद पोलिसांनी दाखल करून घेतली.

परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले कि, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा पाच वाजता फिर्यादी ह्या ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवर असताना तहसीलदार विजय बोरुडे हे अवेळी दारू पिऊन येऊन फिर्यादीस तुमचे मेन अधिकारी कोण आहेत असे म्हणून फिर्यादीने दिलेला ड्युटी तक्ता फेकून देऊन वैद्यकीय अधिकारी यांना फिर्यादीचे फोनवरून शिवीगाळ केली.

फिर्यादीच्या सोबत असलेल्या कक्ष सेवक सचिन ठोंबरे यांना दवाखान्य बाहेर काढून दिले. फिर्यादीशी असभ्य व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर रुगणालयात उपस्थित रुग्णांच्या नातेवाईक मुलीला आवाज देऊन जवळ बोलावून तिच्याशी देखील असभ्य गैरवर्तन करून शिवीगाळ करत रूग्णालया बाहेर निघून गेले. पोलिसांनी बोरुडे यांच्या विरुद्ध भादवि ३५४, ५०४, ५०६ अंतर्गत स्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बलप्रयोग करणे, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे आदि गुन्हे दाखल केला आहे.