शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन आज शुक्रवारी शेवगाव शहरातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात तहसीलदार प्रशांत सांगडे यांचे हस्ते, नगरपरिषदेत मुख्याधिकारी विजया घाडगे यांचे हस्ते डॉ. आंबेडकराच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित आयोजित महाविद्यालयीन स्तर वक्तृत्व स्पर्धा न्या.रानडे सभागृहात संपन्न झाली. तालुक्यातील विविध महाविद्यालयातील स्पर्धकांचा उत्तम सहभाग लाभला.
या स्पर्धेत प्रवरा मेडिकल ट्रस्ट मेडिकल कॉलेजच्या गीतांजली मडके हिने प्रथम, डॉ विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रियांका वाघमारे हिने द्वितीय तर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महावि द्यालयाच्या प्रियांका गारपगार हिने तृतीय क्रमांक पटकावला असून याच महाविद्यालयाच्या ज्ञानेश्वरी नरोटे व साक्षी लांडे यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली.
विजेत्यांना वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. रमेश भारदे, सचिव हरीश भारदे, विश्वस्त मधुकर देवणे यांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. फिरोज काझी, प्रा.सोपान नवथर व प्रा.रामदास कातकडे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. डॉ. ओंकार रसाळ, बाळासाहेब देशपांडे व उमेश घेवरीकर यांनी संयोजन तर निलेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेस मार्गदर्शक शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.