प्रांजल, कल्याणी व मंथन इस्रो सहलीसाठी विमानाने रवाना

शेवगाव प्रतिनीधी, दि. १८ : शेवगाव तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे तीन विद्यार्थी इस्रो सहलीसाठी रवाना झाले आहेत. या सहलीत विविध वैज्ञानिक संशोधन स्थळांना भेट देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी परीक्षा घेऊन इस्रो सहलीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यावर्षी शेवगाव तालुक्यातील जि. प. कोनोशी शाळेची विद्यार्थिनी प्रांजल राजेंद्र खेडकर ( इयत्ता ६ वी ), वरूर बुद्रुक शाळेची कल्याणी अशोक गारपगारे ( इ. ७ वी ) तसेच बालमटाकळी शाळेचा मंथन महादेव कराड ( इ.५ वी ) या विद्यार्थ्यांची निवड झाली.

या विद्यार्थ्यांना गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ,  डॉ. शंकर गाडेकर यांनी इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत अभिनंदन करून सहलीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

हातगावचे केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर व राणेगावचे केंद्रप्रमुख बबन ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना अहिल्यानगरला पोहचवले. तेथे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर अहिल्यानगरहून पुणे येथे प्रवास केल्यानंतर पुण्याहून विमानाने सर्व विद्यार्थी बेंगलुरू येथे पोहचले.

तेथे हॉटेलवर जेवण व मुक्काम केल्यानंतर  मंगळवारी ( दि. १७)  सर विश्वेश्वरय्या म्युझिअमला विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यानंतर विमानाने त्रिवेंद्रमकडे प्रयाण करून तेथे मुक्काम केला. आज बुधवारी ( दि.१८)  डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, संग्रहालयाला भेट दिल्यानंतर त्रिवेंद्रम येथे मुक्काम तर गुरूवारी ( दि.१९) रोजी त्रिवेंद्रम येथील प्राणी संग्रहालय व  मत्स्यालय तसेच तारांगणाला भेट देणार आहे.  

बेंगलुरूकडे विमानाने प्रयाण करतील. बेंगलुरू येथे मुक्काम असून  दि.२० रोजी पुणे येथे त्यांचे विमानाने आगमन होणार आहे. अहिल्यानगर येथे  मुक्काम करून  दि.२१ ला गटशिक्षणाधिकाऱ्या समवेत शेवगावी परतणार आहेत.

Leave a Reply