सरकारने शेतमालाचा हमीभाव कायदा करावा – ॲड सुभाष लांडे 

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : शेतीमाल उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना शेतक-यांकडे माल आल्यावर मात्र भाव पाडले जातात म्हणून सरकारने शेतमालाचा हमीभाव कायदा करावा अशी मागणी भाकपचे राज्य सेक्रेटरी ॲड सुभाष पाटील लांडे  यांनी गुरुवारी (दि .१९ ) तहसीलदार प्रशांत सांगडे व कृषी उत्पन्न  बाजार समितीचे सचिव अविनाश म्हस्के यांना दिलेल्या एका निवेदना द्वारे  केली.
यावेळी कापूस व तूरीला १५ हजार रुपये व सोयाबीनला ११ हजार रुपये प्रति क्विंटल तर उसाला ५  हजार  प्रति टन भाव मिळावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जोरदार निदर्शने करत करण्यात आले.

ॲड. लांडे म्हणाले, मागिल वर्षी तुर अकरा हजार पर्यंत, दोन वर्षांपूर्वी कापूस अकरा हजार रुपये पर्यंत भाव मिळाला होता. चालू वर्षी मात्र तूर, कापूस, सोयाबीन यांचे भाव खूपच पाडण्यात आले असून जिल्हयाबाहेर उसाला विनय कोरे यांच्या कारखान्याने पहीली उचल ४३०० रूपये जाहीर केली आहे. संगमनेर व काही कारखाने ३५०० रूपये पर्यंत भाव देतात. परंतु आपल्या परिसरातील कारखाने तीन हजार रुपयाच्या आत भाव देत आहेत हे  शेतकरयांवर अन्याय करणारे आहे.

सर्व गोष्टींची भाववाढ होत असताना शेतकऱ्याना मात्र हमी भाव मिळत नाही. शेतीमाल उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना शेतक -यांकडे माल आल्यावर मात्र भाव पाडले जातात म्हणून सरकारने हमी भाव कायदा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.         यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे कॉम्रेड संजय नागरे यांचीही भाषणे झाली.

यावेळी  बापूराव राशिनकर, भगवानराव गायकवाड,बबनराव पवार, संदिप इथापे,राम लांडे, दत्ता आरे, आत्माराम देवढे, अशोक नजन, ॲड. भागचंद उकिरडे, गोरक्षनाथ काकडे, सय्यद बाबुलाल, विष्णू गोरे, भिवा घोरपडे, विष्णू चव्हाण, विनोद मगर राजेंद्र आरेकर आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेतीमाल हमी भावाचा कायदा करावा व शेतकऱ्यांची फसवणूक करून हमी भावापेक्षा कमी भावाने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यावसायिकावर  गुन्हा दाखल करण्यात यावा, कृषी उत्पन्न बाजार समितीने शेती मालाच्या खरेदी विक्री वेळी शेतक-यांना हमी भाव मिळावा म्हणून हस्तक्षेप करून शेतकरी हिताची भुमिका घ्यावी.
     – कॉ .ॲड. सुभाष पाटील लांडे