तिनं पिढ्यांपासून वृत्तपत्र विक्री करणाऱ्या ठोंबरे परिवारावर दुःखाचा डोंगर
कोपरगाव, प्रतिनिधी दि. २५ : कोपरगाव येथे गेल्या अनेक दशकांपासून वृत्तपत्र विक्री करणाऱ्या ठोंबरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन वृत्तपत्र विक्रेते पराग प्रकाश ठोंबरे वय ४५वर्षे यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी मध्यरात्री नुकतेच निधन झाले.

वृत्तपत्र विक्रेते पराग प्रकाश ठोंबरे यांच्या पश्चात वडील, एक भाऊ, एक बहीण, काका, काकू असा परिवार आहे. यशवंत बुक स्टॉलचे संचालक तथा वृत्तपत्र विक्रेते प्रकाश ठोंबरे यांचे ते चिरंजीव व श्रीराम बुक स्टॉलचे संचालक व वृत्तपत्र विक्रेते श्रीराम ठोंबरे यांचे ते पुतणे होत.

यशवंत बुक स्टॉलचे संचालक कै. राजाभाऊ ठोंबरे यांचे नातू होते. पराग ठोंबरे यांच्या माध्यमातून ठोंबरे परिवाराची ही तिसरी पिढी वृत्तपत्र विक्री व्यवसायात कार्यरत होती. स्व.पराग स्वभावाने अतिशय शांत, मितभाषी, मनमिळावू तसेच वृत्तपत्र विक्रीच्या माध्यमातून सर्वांसमवेत मिसळून वागणारे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पराग ठोंबरे यांच्यावर बुधवारी दुपारी कोपरगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पराग ठोंबरे यांच्या निधनाची वार्ता समजाताच कोपरगावसह पंचक्रोशीतील नागरीकांनी हळहळ व्यक्त केली तसेच सर्व वृत्तपत्र समुहातीली मालक, संपादक, उपसंपादक तालुका प्रतिनिधीनीसह अनेकांनी शोक व्यक्त केले.
