शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत महावितरणकडून नवीन वीज कनेक्शन द्या – आमदार काळे

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. २१ : महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या वीज पंपासाठी सोलर उर्जेचा वापर करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून शेतकऱ्यांचे ७.५ एचपी पर्यतच्या वीजपंपाचे वीज बिल माफ करून मागेल त्या शेतकऱ्याला सोलर पंप देण्याचा निर्णय अतिशय महत्वाचा असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. परंतु महावितरणकडे शेतकरी नवीन वीज कनेक्शनची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांना प्राधान्याने सोलर पंप मागणीचे अर्ज भरण्यासाठी सांगितले जात आहे.

मात्र शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध होण्यासाठी जवळपास चार ते सहा महिन्याचा कालावधी लागतो. त्या दरम्यान शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यात अडचणी येवून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत नवीन वीज जोड द्यावी अशी आग्रही मागणी आ.आशुतोष काळे यांनी सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे.

हिवाळी अधिवेशनात आ.आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधतांना ते म्हणाले की, महायुती सरकारने राज्यातील जनतेच्या सर्वागीण हिताला प्राधान्य देवून अनेक महत्वाकांशी निर्णय घेतले असून शेतक-यांच्या अडचणी दुर करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार देण्याचा सरकारकडून निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न केले जात आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना ७.५ एचपी वीजपंपाचे वीज बिल माफ करून भविष्यात वीज बिल भरावेच लागणार नाही यासाठी अनुदानावर वीज सोलर पंप दिले जात आहे.

हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय असून त्यामुळे शेतकऱ्यांचा वीज बिलाचा खर्च कायमचा दूर होवून त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेच. त्याच बरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होवून जंगली जनावरांच्या दहशतीखाली रात्री पिकांना पाणी देण्याचा त्रास कायमचा बंद होवून जंगली जनावरांपासून त्यांची सुटका होणार आहे.

सोलर पंप योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे परंतु जोपर्यंत सोलर पंप शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नवीन वीज जोड मिळणे गरजेचे आहे. तसेच नदीकाठी अनेक शेतकरी जागा घेवून विहीर बांधतात व त्या ठिकाणाहून शेतीसाठी पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आणतात त्या ठिकाणी सोलर पंप बसविणे शक्य नाही त्या शेतकऱ्यांना देखील नवीन वीज जोड द्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी केली.

कोपरगाव मतदार संघातील २२० केव्हीचे सबस्टेशन ओव्हरलोड असून त्यामुळे वीज पुरवठ्यात खंड पडतो त्याचा त्रास वीज ग्राहकांना व छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाला होवून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कोपरगाव मतदार संघाच्या शेजारीच सिन्नर तालुक्यातील शहा येथे २३२ के.व्ही.ए.चे सबस्टेशन कार्यान्वित झाले आहे. त्या माध्यमातून ओव्हरलोड असलेल्या २२० केव्ही सबस्टेशनची क्षमतावाढ करावी व सुरु असलेल्या कामातील अडचणी दूर करून त्या कामांना गती द्यावी.

शेतकऱ्यांना सोयाबीन, कांदा पिकाच्या माध्यमातून व जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. याला एकमेव कारण मागील काही वर्षापासून शेतमालाला व दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत नसलेला अपेक्षित दर, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांच्या शेतमालाला व दुधाला योग्य दर मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आयात-निर्यात धोरणात काही बदल करणे शक्य असल्यास ते बदल करून त्यांना अपेक्षित दर देवून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर कराव्यात अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या पोटतिडकीने मांडून शेतकऱ्यांच्या व्यथा काय असतात याकडे सभागृहाचे लक्ष वेधल्याबद्दल शेतकऱ्यांकडून आ.आशुतोष काळे यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply