शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : शेवगाव शहरात विशेषतः शाळा महाविद्यालय परिसरात अलीकडे महिला व शाळकरी विद्यार्थिनींना रोड रोमिओचा होणारा त्रास वाढला आहे. त्याबाबत पोलिस प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करावी. वाहनांचे प्रेशर हॉर्न व बुलेटचे आवाज यावर तात्काळ बंधन घालावे. अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

साईनाथ आघाट, अशुतोष डहाळे, शुभम कबाड्डी, सागर जाधव, प्रथमेश दहिवाळकर, वैभव कोठे, सौरभ क्षीरसागर, अभिजीत कबाड्डी, वैभव पुरनाळे, सोमनाथ मोहिते, मधुकर देहाडराय, अमोल कांबळे, कमलेश लांडगे, सुनील देशपांडे, ओमकार गाढे, आदित्य देशमुख या विविध पक्ष व संघटनेत कार्यरत असलेल्या आघाडीच्या सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यानी एकत्र येऊन ते निवेदन दिले आहे.

निवेदनात बस स्थानक, कॉलेज रोड, बाजार पेठ या ठिकाणी रोड रोमिओंकडून मुलींची छेड काढण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत. वाहनांवरील कर्कश हॉर्न, मोठे आवाज तसेच भरपेठेतून महिला व मुलींची छेड काढत सुसाट वेगाने डबल, टीबल सीट धावणाऱ्या
मोटर सायकली असे प्रकार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. तसेच शहरांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी दादागिरी व गुंडगिरी करणे हेही प्रकार चालू आहेत. ह्या घटना वर पोलिसांनी तात्काळ नियंत्रण आणून कायदा पायदळी तुडविणार्यांना कायद्याचा धाक बसावा यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
