निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान आता डीबीटी प्रणाली द्वारे मिळणार

शेवगाव प्रतिनिधी, दि, २३ : केंद्र व राज्य शासनाकडून राज्यातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनअनुदान दरमहा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. तथापि त्यामध्ये आता शासन पातळीवरून बदल करून ते अनुदान थेट लाभार्थ्यांना डीबीटी प्रणाली द्वारे दिले जाणार असल्याने शेवगाव तालुक्यातील या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार व मोबाईल संलग्न करण्याचे आदेश दिले असल्याने सदर योजनेच्या तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी या कामाची पूर्तता करावी अशी  माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे व संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार निलेश वाघमारे  यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, केंद्र व राज्य शासनाकडून राज्यातील या योजनेच्या असंख्य लाभार्थ्यांना दरमहा अनुदान दिले जाते. शेवगाव तालुक्यात असे २४ हजारावर  लाभार्थी असून आज पर्यंत हे अनुदान देताना ते थेट लाभार्थ्यांच्या  बँक खात्यात जमा केले जात होते. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून अनुदान घेत असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांच्या सध्याच्या बँक खात्याशी आधार व मोबाईल संलग्न करणे बंधनकारक केले असल्याने त्याची पूर्तता लाभार्थ्यांनी तात्काळ करणे आवश्यक आहे.

कारण ती प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्येक लाभार्थ्यांची ईकेवायसी करायची असून तालुक्यातील या योजनेतील एकही लाभार्थी वंचित राहू नये म्हणून सर्वांनी त्याची गांभीर्याने दाखल घ्यायची आहे. जे लाभार्थी याकडे दुर्लक्ष करतील त्यांचे दरमहा मिळणारे अनुदान शासन निर्णयानुसार आपोआप बंद होऊ शकते. तरी लाभार्थ्यानी लावकरात लवकर या कामाची पूर्तता करावी व आपले दरमहा येणारे अनुदान बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन तहसीलदारांनी  केले आहे. 

Leave a Reply