कोणतीही सुचेना न देता अतिक्रमण काढल्याने नागरीकांची पळापळ
कोपरगाव प्रतिनिधी दि. ११ : कोपरगाव जवळील नगर-मनमाड महामार्गालगत बेट भाग ते पुणतांबा चौफुली या परिसरातील अनेक अतिक्रमणे जमीनदोस्त झाली. अचानक राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने दिवसभर कारवाई सुरु झाल्याने अनेकांचे छोटे दुकाने, पञ्याचे शेड, हाॅटेल व इतर दुकाने भूईसपाट झाले.

या घटनेची अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी ११ वाजता शहरातील बेट भागा येथे नगर मनमाड महामार्गावर अचानक जेसीबी व इतर मशिनरी सह पोलीसांच्या फौजफाट्यासह राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळाचे संगमनेर येथील उपअभियंता अभिमान्यू जमाळे आले. त्यांच्या समवेत त्यांचे विभागाचे ६ कर्मचारी अधिकारी, इतर ६ अधिकारी , एस ए. यादव कंपनीचे २० कर्मचारी यांनी महामार्गाच्या कामाला अडथळा ठरणारे अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली.

बेट भागा पासुन अतिक्रमण केलेले अर्थात महामार्गासाठी संपादीत केलेल्या जमीनीवर केलेले कच्चे पक्के बांधकाम, पञ्यांचे शेड, एका ट्रॅक्टर कंपनीचे शोरूम, खतांचे गोडाऊन, चहाच्या टपऱ्या, नाष्टा सेंटर व इतर छोटे मोठे व्यवसाय थाटलेल्यांची अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने भूईसपाट केले. अचानक आलेल्या फौजफाट्याला पाहुन नागरीकंची एकच पळापळ सुरु झाली.

बहुतांश व्यवसायीकांना आपण अतिक्रमण करुन व्यवसाय करतो हेच ज्ञात नव्हते. त्यांना वाटले की, हि जागा आपल्याच मुळ मालकीची आहे, असे समजून दुकाने थाटली होती. राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळाने यापुर्वीच महामार्गाशेजारील जमीन भूसंपादन केली होती. नगर मनमाड महामार्गाची एकुण रुंदी ५० मिटर आहे. त्यामुळे सध्याच्या महामार्गाच्या मधोमध माप घेवून दोन्ही बाजूला २५ मिटर रुंदी प्रमाणे ५० मिटरचा रस्ता रूंदीकरणासाठी खुला करत असल्याची माहीती उपअभियंता अभिमान्यू जमाळे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, आम्ही अतिक्रमण मोहीम राबवली नसुन भूसंपादनाची रितसर कारवाई केली आहे. संबंधीत नागरीकांच्या मालकीची पुर्वी जमीन असली तरी त्या जमीनीचा मोबदला भूसंपादनाच्यावेळी ठरल्याप्रमाणे दिला आहे. संबंधीत जागेवर आता रस्ता रुंदीकरणाचे मोठे काम सुरु आहे.

सावळी विहीर ते कोपरगाव पर्यंत ८.६६ किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे काॅंक्रीटीकरणाचे काम सुरु झाले आहे. त्यात पुणतांबा फाटा व बेटनाका येथे दोन भुयारी उड्डाण पुल बांधण्यात येणार आहे. हे काम पुण्याच्या एस ए यादव कंपनीला १२३ कोटीला देण्यात आले आहे. बहुतांश ठिकाणच्या रस्त्याचे काम झाले आहे.

केवळ १.४१० किमी अंतर अर्थात पुणतांबा चौफुली ते बेट या दरम्यानच्या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने ते तातडीने येत्या काही महिन्यात पुर्ण करण्याची लगबग सुरु आहे. तेव्हा आजुबाजूचे बेकायदेशीर केलेले बांधकाम काढण्यासाठी हि मोहीम राबवली आहे असेही त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत कोपरगाव करांना शिर्डीकडे जाणारा रस्ता सुखकर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भूसंपादन करतेवेळी आम्हाला आमच्या जमीनीचा अपेक्षित मोबदला मिळाला नाही. त्यासंदर्भात आमच्या तक्रारी आहेत. आमच्या मालकीच्या जागेत आम्ही बांधलेले शेड व बांधकाम पाडून आमच्यावर अन्याय केले आहे. शिवाय कोणतीही पुर्वसुचना न देता आमच्या घरावर जेसीबी फिरवल्याची खंत नागरीकांनी व्यक्त केली असुन या अन्यायाविरुद्ध कोर्टात जाणार असल्याचे सांगिले.