बेकायदा कत्तलखाने व पक्क्या घरावर पालीकेने फिरवला जेसीबी 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम पालीकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गेल्या दोन दिवसांपासून सुरु केली माञ शनिवारचा दिवस अनेकांना धडकी भरवणारा ठरला. पालीका प्रशासनाने थेट पक्के घरं, व्यापारी संकुल व बेकायदा कत्तलखान्यावर अचानक जेसीबी फिरवून काही क्षणात होत्याचे नव्हते केले. आजपर्यंत कधी झाली नाही अशी कारवाई पालीका  प्रशासनाने करुन बेकायदा बांधकाम करणाऱ्यांची झोप उडवली आहे.

 शनिवार दिवसभर अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली माञ खास करुन संजयनगर ते बैलबाजार रोड या परिसरातील अनेक घरावर जेसीबी फिरवला. अतिशय चिवळ झालेला हा रस्ता आता मोकळा करण्यात आला. या रस्त्याच्या कडेला अनेक पक्के घरे होती. तसेच याच भागातील आयेशा काॅलनी येथील बेकायदा कत्तलखाने चालु होते.

वारंवार पोलीस कारवाई करून गोमांस पकडले जायचे लोकसंवादने वृत्त मालीका लावून यावर लक्ष वेधल्यानंतर स्थानिक प्रशासनाने बेकायदा कत्तलखाने बंद केली होते. अतिक्रमण मोहीमेच्या पथकांनी खास करुन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या पुढाकाराने संबंधीत कारवाई झालेले कत्तलखाने जेसीबी लावून उध्वस्त केले.

तहसीलदार महेश सावंत मुख्याधिकारी सुहास जगताप, निवासी तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते, नगररचना विभागाच्या सहाय्यक नगररचनाकार अश्विनी पिंगळ व संबंधीत विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी एकवटून ही धाडशी मोहीम हाती घेतल्याने अनेक अतिक्रमणे नेस्तनाबूत करण्यात यश आले. तर शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळाच्या जवळील अरशी काॅम्पलॅक्स या मोठ्या चार मजली पक्क्या इमारतीचा थेट एक मजलाच  पाडण्यात आल्याने कोपरगावमधील बेकायदा इमारती बांधणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

संबंधीत इमारतीच्या मालकाने आपल्या तीन मजली व्यावसायीक इमारतीवर बेकायदेशीर चौथा मजला थाटून व्यायाम शाळा सुरु केली होती. नागरीकांच्या अनेक तक्रारीवरून अखेर आज त्या इमारतीचा वरचा मजला व खालची पार्कींग पालीका  प्रशासनाने नेस्तनाबूत करुन बेकायदा, विनापरवाना बांधकाम केल्यावर अशीच कारवाई येत्या काळात करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिला.

मुख्याधिकारी जगताप पञकारांशी संवाद साधताना म्हणाले की, यापुढे कोणतेही बेकायदा अतिक्रमण, अथवा विनापरवाना बांधकाम खपवून घेतले जाणार नाही. ज्यांनी कोणी आपल्या मालकीच्या जागेत अथवा शासकीय जागेत अनाधिकृत बांधकाम केले असेल त्यांनी त्वरीत काढून घ्यावे अन्यथा कोणतीही पुर्वसुचना न देता कधीही संबंधीत बांधकाम पाडणार आहोत. तसेच बांधकाम पाडण्यासाठी लागलेला संपूर्ण खर्च त्या त्या व्यक्तीच्या नावे टाकुन वसुल केला जाणार आहे. तेव्हा पालीका प्रशासनाला अनाधिकृत बांधकामे पाडण्याची वेळ येवू न देता त्वरीत बांधकाम काढून घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान शनिवारी दिवसभर शहरातील टाकळी नाका ते गोदावरी पेट्रोल पंप, बैल बाजार रोड ते संजयनगर, एसजी विद्यालय ते कन्या शाळा तसेच शहरातील इतर ठिकाणचे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे केले. काही ठिकाणी नागरीकांनी स्वत: होवून अतिक्रमण काढून घेतले होते तर काहींनी जाणुनबुजून अतिक्रमण काढले नव्हते त्यामुळे त्यांच्या घरावर व दुकानावर जेसीबी फिरवण्यात आला.

रविवारचा दिवस विश्रांती घेवून पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील अतिक्रमण मोहीम या पेक्षा अधिक कडक करण्याची तजवीज स्थानिक प्रशास करणार असल्याची माहीती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली. 

Leave a Reply