गोदावरी डाव्या कालव्याला १ मार्चपासून पाणी सुटणार
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : गोदावरी डाव्या कालव्याला १ मार्च पासुन उन्हाळी पहीले आवर्तन सुटल्याने कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावाच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाची समस्या मिटली असुन भर उन्हात उभ्या पिकांना जीवदान व नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे.

योग्य वेळेत योग्य नियोजन करुन पाटबंधारे विभागाने यावेळी पाणी सोडण्याचा आराखडा सुलभ केल्यामुळे हे आवर्तन शेतकऱ्यांना लाभदायक ठरले आहे.अशी माहीती कोपरगाव गोदावरी डावा तट कालवा जलसंपदा विभागाचे अभियंता संदीप पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, सध्या गोदावरी डाव्या कालव्याला १ मार्च पासुन नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सिंचन व पिण्याचे आवर्तन सोडले जाणार आहे हे आवर्तन २७ ते ३२ दिवसांसाठी असणार आहे.

या दरम्यान १८ ग्रामपंचायती, कोपरगाव व वैजापूर नगरपालीका, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, गोदावरी दूध संघ, वारी येथील सोमैया कारखाना यांना पिण्याचे आवर्तन सोडले आहे तर शेतकऱ्यांच्या मागणी अर्जा प्रमाणे शेतीसाठी सिंचनाचे पाणी देणार आहे. शेतीसाठी मागणी अर्ज भरण्याची मुदत २८ फेब्रुवारी पर्यंत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाण्याची गळती व चोरी थांबवण्यासाठी पाटबंधारे विभागाने विशेष पथके तयार करुन पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाटबंधारे विभागाने अवघ्या दिड महिन्यात पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडल्याने कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याची वनवन कमी केली. तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून पाचव्या साठवण तलावातील मुबलक पाण्यामुळे भर उन्हाळ्यात तीन दिवसाआड पाणीपुरवठा पालीका करत असल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

सध्या कोपरगाव नगरपालीकेकडे पाण्याचा साठा उपलब्ध आहे. नाशिकच्या धरणांमध्ये गेल्या वर्षी या दरम्यान केवळ ४५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. माञ यावर्षी तब्बल ६४.८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नेहमी वादाचा मुद्दा ठरलेल्या जायकवाडी धरणातही उपेक्षित पाणी साठा असल्याने नाशिकच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याची गरज भासणार नाही.

सध्या नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणात ७६.१९ टक्के उपयुक्त पाणी साठा आहे तर मुकणे- ६५.१९ टक्के, गंगापूर -७५.२८ टक्के, वाकी-६२.१२ टक्के, भाम – ५९.४२ टक्के, भावली – ४२. १२ टक्के,वालदेवी – ८३.२३ टक्के, कश्यपी – ९३. ५७ टक्के, पालखेड – ३१.३९ टक्के, आळंदी – ५२.२५ टक्के, कडवा – ४१.८२ टक्के धरणात पाणी साठा उपलब्ध असल्याने यावर्षीचा उन्हाळा पाण्यासाठी अल्हाददायक असणार आहे.

चालु वर्षीच्या पावसाळ्यात जायकवाडी धरणात एकट्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून तब्बल ५८ टीएमसी पाणी गोदावरी नदीतून वाहुन गेल्याने जायकवाडीची सध्याची पाणी पातळी मुबलक आहे. जायकवाडीच्या पाणी पातळीवर नगर- नाशिक करांची धाकधूक अवलंबून असते. सध्या तरी सर्व काही आलबेल असल्याचे यावर्षी पाणी प्रश्न कोणालाही भेडसावणार नसल्याचे चित्र आहे. जर बेकायदा पाणी उपसा झाला तर पाणीचोरीची समस्या भेडसावू शकते असे सध्याचे चिञ आहे.
