परमार्थ, सदाचार व सुसंस्काराची मूल्ये समाजमनावर रुजविण्यात संतांचे अलौकीक योगदान – वि. दा. पिंगळे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २० : जातीयता, अस्पृष्यता आणि धार्मिक वांशिकतेवर प्रहार करुन मानवतावादी दृष्टीकोन मांडताना संतांनी समाजाला नैतिकता, मानवता आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखविला. परमार्थ, नीती, सदाचार, सुसंस्कार या गोष्टी समाजमनावर रुजविण्यासाठी संत परंपरेचे अलौकीक योगदान समाजाला लाभलेले असल्याचे उद्‌गार पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे सर यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात काढले.

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या २१ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानातून ” संत परंपरा व सामाजिक प्रबोधन..”  या विषयावर पिंगळे सर बोलत होते.

पुणे येथील शिक्षणतज्ज अनिलराव गुंजाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले. संवत्सर ग्रामस्थांच्यावतीने श्री पिंगळे सर व श्री गुंजाळ सर यांचा सत्कार करण्यात आला.

संतांनी आपल्या आचरणातून मानवी मूल्यांचा केलेला विचार आदर्शवत आहे. या आदर्शामुळेच महराष्ट्राच्या लोकजीवनावर उत्तम संस्कार झालेले आहेत. संतांनी मानवतेची गुढी उभारताना माणुसकीला प्रतिष्ठा मिळवून दिली. अनासक्त माणसे लोकोध्दाराचे केवढे प्रचंड कार्य करु शकतात याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली संत परंपरा असल्याचे सांगून पिंगळे पुढे म्हणाले, संतांनी केवळ संत साहित्याचीच निर्मिती केली नाही तर, सामाजिक प्रबोधनातून भक्ती, श्रध्दा, अंधश्रध्दा, लोकसंस्कृती, लोकदैवत, लोककथा, लोकगीत व अभंगांमधून समाज मनाला हात घातला.

वैदीक मार्ग झाडून व तो स्वच्छ करून आपल्या लोकांना कळेल अशा भाषेत सिध्दांत देखील मांडला. या सिध्दांतामुळेच कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला भक्तीपंथाच्याद्वारा आध्यात्मिक उन्नती साधण्यास, नैतिक सामर्थ्य वाढविण्यास व प्रापंचिक दुःखावर मात करण्यास मदत झाली. भक्ती चळवळीची पताका प्रत्येक संतांनी आपल्या खांद्यावर घेऊन वेगवेगळे तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातील वारकरी संप्रदाय अढळ स्थान घेऊन आजतागायत खंबीरपणे उभा असून अद्वैत तत्त्वज्ञानाचा भक्कम आधार या संप्रदायाने लोकांना दिला असल्याचे सांगून आध्यात्माच्या भक्ती चळवळीचा सामाजिक इतिहास व जीवनाचे तत्त्वज्ञान प्रत्येकाने सात्विक सृजनशील मनाने स्वीकारुन त्या वाटेने मार्गक्रमण करावे असे मार्गदर्शनही पिंगळे यांनी केले.

संतांचे सामाजिक योगदान हे अभूतपूर्व व कालातीत आहे. चातुर्वणीय आणि वैदीक रुढीची खोलवर रुजलेली मुळे संतांनी उखडून टाकून समरसता, बंधुभाव आणि भेदाभेदाची दरी  दूर केली. संत परंपरेने समाजाला नैतिकता, मानवता आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग तर दाखविलाच परंतु समाज सुधारासाठीचे ते प्रभावी माध्यम देखील ठरले. संत परंपरेने मानवतेच्या कल्याणातून सामाजिक समरसतेचा अखंड प्रवाह जनमाणसात खळाळत ठेवला असून तो आजही अव्याहतपणे सुरु असल्याचे सांगून माणसाला मोक्ष मिळविण्यासाठी तीर्थ यात्रा करण्याची किंवा संसाराचा त्याग करण्याची गरजच नाही. चांगले कर्म हाच खरा मोक्ष आहे.

महापुरुष किंवा महात्मा होण्यासाठी हृदयामध्ये मातृत्वभाव निर्माण झाला पाहिजे. मातृत्वाचे पिसारे अंगभर फुटले पाहिजेत. आपल्याभोवती जे जे चांगले आहे त्यातून आपण जे ऐकतो, पाहतो, अनुभवतो ते माणूस म्हणून जगायला खूप उपयोगी पडते असेही श्री पिंगळे यांनी सांगितले.

शिक्षणतज्ञ्ज अनिलराव गुंजाळ यांनी आपल्या भाषणातून स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांना आदरांजली वाहताना अशी माणसे शतकातून जन्माला येतात. जो निःस्वार्थपणे आणि मातृत्वाच्या कळवळ्याने सामाजिक सेवा करतो त्याच्याकडे समाज देव म्हणून बघतो. आण्णांच्या कार्यातून आणि जगण्यातून देवत्वाची प्रचिती येते. माणसाला जगण्यासाठी जी मूल्ये लागतात ती आयुष्यभर जपली तर जगण्याचे सार्थक होते.

माणसाने एकमेकांचे झाल्याशिवाय सामाजिक प्रगती होत नाही हे आण्णांनी ओळखले होते. आजच्या पिढीने अशा आदर्शवत माणसांच्या मौलिक विचारांची पेरणी केली पाहिजे. त्यातून जे उगवेल ते संस्काराच्या वाटेवर हिरवळ निर्माण करीत जाईल असे सांगून गुंजाळ यांनी संस्कार चांगले असले की, संसार चांगला होतो याबाबत विद्यार्थी –  विद्यार्थीनींना मागदर्शन केले.

संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय तसेच कोपरगांव महिला महाविद्यालयातील गरीब, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना सुमारे २ लाख ५५ हजार रुपये शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामस्थ व विविध सामाजिक, शासकीय, शैक्षणिक संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थीनी यांची मोठी उपस्थिती होती. उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply