लोकतंत्र सेनानींचा विखे यांच्या हस्ते सन्मान
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : आपल्या लोकशाहीची खरी ताकत संविधानच आहे. आणीबाणीच्या काळात मुलभूत अधिकार संपवण्याचा प्रयत्न झाला. लोकशाही वाचवण्यासाठी आणीबाणीच्या काळात देशभर संघर्ष झाला पण त्यात कोपरगाव अग्रभागी होता. हेच लोकशाहीचे खरे सेनानी आहेत अशी भावना राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

भारतीय जनता पार्टी, वसंत स्मृती कार्यालय व स्व. खासदार सुर्यभान पाटील वहाडणे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणीबाणीच्या काळात लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करुन ५० वर्षापुर्वी १९ महीणे तुरूंगवास भोगला अशा तालुक्यातील २४ लोकतंत्र सेनानी व भाजपच्या विविध कार्यात निष्ठेने कार्य करणाऱ्यांचा सन्मान सोहळा शहरातील व्यापारी धर्मशाळेत आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितिनराव दिनकर होते.

यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष वाल्मिक भोकरे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, विज नियंञण व भारतीय दूर संचार निगम संस्थेचे केंद्रीय सदस्य अॅड रविंद्र बोरावके, राज्य महानंद दूध संघाचे माजी अध्यक्ष राजेश परजणे, विनायक गायकवाड, सुभाष दवंगे, संजय कांबळे, चेतन खुबाणी,यांच्यासह लोकतंत्र सेनानी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकतंत्र सेनानी व त्यांच्या वारसांचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हाणाले की, आणीबाणीच्या संघर्षमय काळात मोठा संघर्ष करुन देशाचे संविधान ५० वर्षांपूर्वी वाचवलेले तालुक्यातील २४ जनांचा सन्मान माझ्या हस्ते करण्याचे भाग्य मला लाभले खरं तर मीच भाग्यवान स्वताला समजतो.

आपल्या तत्वांशी तडजोड न करता निर्भिडपणे लढले. परिवाराचा विचार न करता देशाची लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी १९ महीने तुरूंगवास अनेकांनी भोगला. लोकतंत्र सेनानींची हि देशाच्या स्वातंत्र्यासाठीची दुसरी लढाईच म्हणावी लागेल. असे म्हणत जुन्या भाजपच्या तत्कालीन नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या आठवणींना उजाळा विखेंनी देत सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी विजय वहाडणे म्हणाले की, भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते निष्ठेने पार्टीचे कार्य करीत सतात. राधाकृष्ण विखे पाटील आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे या निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांचे पालकत्व तुम्हीच स्विकारावे. आम्हाला कुठले पद नको ना कुठली उमेदवारी नको अशी विनंती विखेंना करीत आणीबाणीच्या काळात तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षाची आठवण सांगाताना वहाडणे यांना गहिवरुन आले.

यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. दिवंगत लोकतंत्र सेनानी यांच्या आठवणींनी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. हा सन्मान सोहळा यशस्वीतेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
