हेल्पिंग हंड्सचा विद्यार्थांना मदतीचा हात
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७, महाराष्ट्र राज्याला महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची परंपरा लाभली आहे. मुलींच्या शिक्षणाला राज्यात प्रोत्साहित केले गेले. कर्मवीर अण्णा, क्रांतिकारक बुवासाहेब बोरकर यांनी अनाथ, दलित, भटक्या, परिघाबाहेर असलेल्या घटकासाठी मोठे कार्य केले. जिल्ह्यामध्ये शिक्षणासह अशा दुर्लक्षित घटकांसाठी अनेकांनी उपक्रम राबवून ह्या परंपरेची जपवणूक केली. हेल्पिंग हंॅड्सचे दत्तात्रेय खेमनर सुद्धा हि परंपरा पुढे नेण्याचे कार्य करीत आहे, असे गौरवोद्गार स्नेहालयचे संस्थापक प्रा. डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी केले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल, हुशार, होतकरू विद्यार्थांना हेल्पिंग हंॅड्स या स्वयंसेवी संस्थेमार्फत उच्चशिक्षणासाठी दिल्या जाणार्या आर्थिक मदतीच्या डी डी. वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोक रोहमारे होते. व्यासपीठावर संस्थापक दत्तात्रेय खेमनर, डॉ.गोवर्धन हुसळे, उद्योजक पंकज लोढा होते. पाहुण्यांचा परिचय डॉ.विलास आवारी यांनी करून दिला.

प्रास्ताविकात दत्तात्रेय खेमनर म्हणाले, वडील मेंढपाळ,आई गृहिणी त्यात आर्थिक अडचणींना तोंड देत शिक्षण घेत पुढे गेलो, उभे राहिलो. समाजातील इतरांना अडचणींचा सामना करावा लागू नये या हेतूने २०१० साली हेल्पिंग हंॅड्सचे रोपटे लावले. सोळा वर्षात १२७ पेक्षा जास्त विद्यार्थांना ७० लाख रुपयांची मदत करता आली. समाजातील दानशूर संस्थेचे कार्य पाहून पुढे येतात. गरजूंना मदतीसाठी मला दररोज केवळ एक रुपया मदत करा असे आवाहन हि खेमनर यांनी केले.

कुलकर्णी पुढे म्हणाले, समाजाप्रती जाणीव असलेली लोक आयुष्यात आपल्याला भेटतात.वेळ प्रसंगी ते त्याचा मागोवा देतात. आजच्या पिढीने गरिबी पाहिलेली नाही. खेमनर यांनी केलेला संघर्ष व त्यातून उभे केलेले कार्य त्यांना काल्पनिक कथेसारखे वाटेल.अडीअडचणीना तोंड देऊन संघर्ष करून ज्या हालपेष्टा सोसल्या त्याची जाणीव ठेवून आपण समाजाला परत काय देतो, हा खरा प्रश्न असतो. अडचणी सर्वाना असतात, पण आपल्या ताटातील भाकरी दुसऱ्याला देता आली पाहिजे. ज्या विद्यार्थांनी मदत घेतली त्यांनी इतरांसाठी पुढे येत मदतीचा हात द्यावा असे आवाहन यावेळी कुलकर्णी यांनी केले.

अध्यक्षीय मनोगत अशोक रोहमारे यांनी व्यक्त केले. यावेळी स्नेहालयचे गिरीष कुलकर्णी यांनी हेल्पिंग हंॅड्सला एक लाख रुपये देणगी देणार असल्याचे जाहीर केले. सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे तर आभार डॉ. गोवर्धन हुसळे यांनी मानले. या प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, डॉ .इंद्रवदन डोडिया, अविनाश घैसास, भाऊ थोरात, सुनील बोरा, पराग संधान, बबलू वाणी, श्रीनिवास खरवंडीकर, व्ही.बी.शिंदे, नम्रता लोहिया, अण्णासाहेब बावके आदींसह मान्यवर उपस्थित होते.
