छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे युवकांचे प्रेरणास्त्रोत – विवेक कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारल्यावरच अंगात उत्साह संचारतो. केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची आन, बान आणि शान असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत. छत्रपती शिवराय हे समस्त युवकांचे प्रेरणास्त्रोत व ऊर्जास्रोत असून, त्यांचे आचार, विचार व शिकवण अंगिकारण्याबरोबर येणाऱ्या पुढच्या पिढीला शिवरायांच्या कार्याची माहिती देण्याचे काम झाले पाहिजे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर कोपरगाव तालुक्यातील वारी येथील रहिवासी ह.भ.प. गणेश महाराज गोंडे यांनी गायलेल्या व ह.भ.प. सर्जेराव महाराज टेके यांनी लिहिलेल्या ‘सिंहाच्या जबड्यात घालूनी हात, मोजीन दात, ही मर्द मराठ्यांची जात’ या गीताचे लाँचिंग युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते गुरुवारी (१६ फेब्रुवारी) करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार असून, त्याचे औचित्य साधून कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गायक ह.भ.प. गणेश महाराज गोंडे, गीतकार ह.भ.प. सर्जेराव महाराज टेके यांच्यासह देवराज रेकॉर्डिंग स्टुडिओचे रेकॉर्डिस्ट सौरभ सावतर, संगीतकार विजय सावतर, प्रतीक फुलपगार, भरत सगट, प्रकाश गुंडेकर, वसंत टेके, विशाल गोर्डे, प्रशांत संत, रोहित कनगरे,बाजीराव गोंडे, विनायक शंखपाल, अनिल पंडोरे, गणेश पवार, चेतन गांगुर्डे, प्रशांत महीले आदी उपस्थित होते.

विवेक कोल्हे म्हणाले, आपल्या कार्यकर्तृत्वाने जगभरात ख्याती मिळविलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य प्रेरणादायक आहे. कोपरगाव तालुक्याचे भूमिपुत्र असलेले वारी येथील ह.भ.प. गणेश महाराज गोंडे, ह.भ.प. सर्जेराव महाराज टेके व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्यावर ‘सिंहाच्या जबड्यात घालूनी हात, मोजीन दात, ही मर्द मराठ्यांची जात’ हे गीत सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे. हे स्फूर्तिदायी गीत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून नक्कीच लोकप्रिय होईल, असे सांगून विवेक कोल्हे यांनी ह.भ.प. गणेश महाराज गोंडे, ह.भ.प. सर्जेराव महाराज टेके व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

  कोल्हे यांनी सांगितले की, ‘जागवूया ज्योत माणुसकीची’ हे ब्रीद्वाक्य घेऊन युवा, पर्यावरण, कृषी, सामाजिक एकता, आरोग्य या पाच उद्दिष्टांनुसार संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या आठ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित नि:स्वार्थीपणे कार्य करत आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठान कोपरगाव तालुक्यातील कलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. गड-किल्ल्यांची स्वच्छता, महापुरुषांची जयंती, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य शिबिरे, ग्राम स्वच्छता, पर्यावरण संतुलन आदी विविध उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठानमार्फत राबविले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी, कुशल  संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम, आदर्श व नीतिवंत राजे होते. त्यांच्या साहस कथा, विचार, तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून समस्यांवर मात करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. त्यांनी धर्मनिरपेक्ष व सहिष्णु वृत्तीने उत्तम राज्य कारभार करून एक सक्षम राजा कसा असायला हवा याचे उदाहरण घालून दिले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला.

जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे, ज्यांनी सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. ज्या शिवरायांनी महाराष्ट्रासाठी जीवनऊर्जा समर्पित केली, त्यांचे जीवनचरित्र चौकटीत बंदिस्त करण्यापेक्षा त्यांच्या जीवनकार्याचा प्रचार व प्रसार करण्याची गरज आहे. त्यांचे आचार-विचार अंगिकारणे हेच आपल्यासाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचे ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आजही प्रत्येकाचे आदर्श आहेत. शिवाजी महाराज संपूर्णत: निर्व्यसनी होते. युवकांनी त्यांचा आदर्श घेत इंटरनेट व मोबाईलच्या आहारी न जाता आपला वेळ व शक्ती समाजकार्यासाठी खर्ची घालावी, असे आवाहन कोल्हे यांनी केले.

प्रारंभी ह.भ.प. गणेश महाराज गोंडे व ह.भ.प. सर्जेराव महाराज टेके यांनी ‘सिंहाच्या जबड्यात घालूनी हात, मोजीन दात, ही मर्द मराठ्यांची जात’ या गीताची पार्श्वभूमी कथन केली. विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते या गाण्याच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. ह.भ.प. गणेश महाराज गोंडे व ह.भ.प. सर्जेराव महाराज टेके यांचा सत्कार कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.