कोपरगाव प्रतिनिधी दि. २३ : श्रावण मास समाप्तीनिमित्त निवारा परिसरातील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात व श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथून आणलेल्या भगवान शंकराच्या मूर्ती व महादेव पिंडीचा महाआरती सोहळा तसेच पिंडीस भात लेपन सोहळा उत्साहात पार पडला.

हा धार्मिक सोहळा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, कुंभारी येथील श्रीक्षेत्र राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राजेश्वरानंदगिरी महाराज, साध्वी शारदानंदगिरी, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुरासे, निवारा हाऊसिंग सोसायटीचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन निवारा भजनी मंडळ अध्यक्षा सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली तर साई निवारा मित्र मंडळ अध्यक्ष जनार्दन कदम यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

निवारा परिसरातील महादेव मंदिरात पिंडीला भात लेपन हा धार्मिक विधी गेल्या १५ वर्षांपासून कोयटे परिवाराकडून सातत्याने होत आहे. या मंदिरात शंकर पिंडीची प्राणप्रतिष्ठा सुमारे ४० वर्षांपूर्वी काशीबाई दादाप्पा कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. तसेच कार्तिक महिन्यात येथे काकड आरती उत्सवही ह.भ.प. बाबासाहेब कापे व हौशीराम बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या जल्लोषात पार पडतो.

श्रावण समाप्ती महाआरती प्रसंगी निवारा, ओम नगर, शंकर नगर, कोजागिरी कॉलनी, सुभद्रा नगर, सह्याद्री कॉलनी, द्वारका नगरी, रिद्धी-सिद्धी नगर, शिंगी-शिंदे नगर, साई सिटी, जानकी विश्व, येवला रोड आदी भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी प्रमुख संत-महंतांचे पूजन संदीप ओमप्रकाश कोयटे, सौ.स्वाती संदीप कोयटे व जनार्दन कदम यांच्या हस्ते करण्यात आले. महाआरतीला निवारावासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

काशीबाई दादाप्पा कोयटे यांच्या समवेत प्राणप्रतिष्ठा प्रसंगी उपस्थित राहून आजवर शंकर भक्तीत रमलेल्या जेष्ठ महिला शिवभक्त श्रीमती विमल दत्तात्रय कर्डक, सौ.सुशीला श्रीरंग झावरे, श्रीमती कमल बाजीराव पाटील, श्रीमती कमल चंद्रकांत गिरमे, श्रीमती विमल रामनाथ भट्टड, श्रीमती सुलोचना विष्णू गागरे, श्रीमती द्वारकाबाई श्यामलाल भट्टड व श्रीमती यमुनाबाई रोकडे यांचा साध्वी शारदानंदगिरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

निवारा परिसरात श्रावण व कार्तिक महिन्यात आयोजित धार्मिक उपक्रमांमुळे येथे सतत धार्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण होत असल्याचे साई निवारा मित्र मंडळ अध्यक्ष जनार्दन कदम यांनी सांगितले.

यावेळी बाबासाहेब जंगम, माजी नगरसेविका दीपाताई गिरमे, बापूसाहेब इनामके, प्रदीप साखरे, रामोशेठ पटेल, राजेंद्र नानकर, चांगदेव शिरोडे, सुरेंद्र व्यास, विष्णुपंत गायकवाड, लक्ष्मीनारायण भट्टड, डॉ.नरेंद्र भट्टड, अमोल राजूरकर, वैभव गिरमे, जगन्नाथ बैरागी, श्रीरंग झावरे, सुरेश भडकवाडे, नानासाहेब गव्हाणे, धनंजय भडकवाडे, डॉ.अच्युत कर्डक, बाळकृष्ण उदावंत, कमलाकर नरोडे, दशरथ सरवान, संतोष बैरागी, कृष्णा गवारे, ओम उदावंत आदींसह परिसरातील शिवभक्त परिवारासह उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार अनंत बर्गे यांनी मानले.
