शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : गेली दोन दिवस वरुण राजाने हा परिसर मनसोक्त धुवून काढून श्री क्षेत्र वरूर या धाकट्या पंढरीतील विठू माऊलीला अभिषेक घातला आणि आज बुधवारी दिवसभर भाविकांसाठी पूर्ण उघडीप दिल्याने माऊलीच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांची गर्दी उसळली. यंदा भाविकांच्या गर्दीने उचांक केला. दीड लाखावर भाविकांनी माऊलीच्या दर्शनाचा लाभ घेतला. टाळ – मृदंगाचा निनाद व ‘ पुंडलिक वरदा हरी विठ्ठला…’ च्या जयघोषात विठूमाऊलीचे भक्त अक्षरशः भक्तीरसात चिंब झाले.
श्रीक्षेत्र वरुर येथील मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रीविठ्ठल – रुक्मिणीच्या सावळ्या वालुकामय मूर्ती स्वयंभू असल्याने वारकरी संप्रदायात या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व असत्यानेआषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील त्रिवेणी संगमावर वैष्णवांचा मेळाच भरला . पंचक्रोशीतून वरुरला येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
येथील भक्त पुंडलिक मंदिराच्या वाळवंटावर सकाळी साडे दहाला श्री क्षेत्र पैठणहून पायी आणलेल्या गंगाजलाच्या कावडीचे हभप मुकुंद महाराज अंचवले,गौरव अंचवले व ग्रामपंचायत सदस्य गणेश बेडके यांच्या हस्ते पूजन झाले. गंगाजलाने श्रीविठ्ठल-रुक्मिणीला जलाभिषेक व रुद्राभिषेक घालण्यात आला. सायंकाळी नगर प्रदक्षिणेत यादव बाबा भक्ती पिठाच्या वारकऱ्यांनी व पंच क्रोशीतील टाळकऱ्यानी पुंडलिक मदिराच्या प्रांगणात अतिशय आकर्षक रिंगण सोहळा सादर केला. रात्री भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले यांचे जाहीर कीर्तन व हरी जागराचा कार्यक्रम झाला.
आज सकाळी सहाला शेवगाव सायकल क्लबच्या ७० सदस्यांनी सायकल दिंडी आणून शेवगाव – वरूर मार्गावर वृक्षारोपण करून विठूमाऊलीचे दर्शन घेतले. त्यानंतर दिवसभरात सामनगाव, आखेगाव, देवटाकळी, उचल फौंडेशन शेवगाव व माळेगावने आदि मोठ्या दिंड्यानी परिसर दुमदुमुन गेला.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री खा. संदिपान भुमरे, खा. निलेश लंके, आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, डॉ.क्षितीज घुले, काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे, माजी जि. प. सदस्या हर्षदा काकडे, भाजपाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य चिटणीस ॲड प्रताप ढाकणे, अरुण पाटील लांडे, विद्या गाडेकर आदिनी दर्शन घेतले. यात्रा समितीने नेटके नियोजन केल्याने भाविकांना कुठेही अडचण आली नाही. विविध तरुण मंडळाच्या वतीने ठिकठिकाणी भाविकांना फराळ, केळी, जारचे शुद्ध पाणी व चहाचे मोफत वाटप करण्यात आले.
आज आषाढी निमित्त धाकट्या पंढरीला भाविकांची अलोट गर्दी झाली. येऊ घातलेल्या विधान सभा निवडणूकीतील या मतदार संघातील संभाव्य उमेदवारांनी या निमित्ताने भाविक मतदारासी संपर्क साधण्याची पर्वणी साधली. आ. मोनिकाताई राजळे, माजी आ. चंद्रशेखर पाटील घुले, ॲड. प्रताप ढाकणे व हर्षदा काकडे यांनी या मार्गावर कमानी उभारून भाविकांचे स्वागत केले तसेच फराळ पाण्याची देखील व्यवस्था केली होती.