विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन केल्यास देशात सुशासन निर्माण होईल – पोलीस निरीक्षक भगवान मथुरे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन केल्यास देशात सुशासन निर्माण होईल देशातील युवाशक्ती ही मोठी विधायक ताकद असते त्यांनी जर ठरवले तर ते आपल्या आई-वडिलांना गौरवास्पद व भूषणावह कामगिरी करू शकतात. असे उद्गार  वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे  यांनी के.जे. सोमैया महाविद्यालयामध्ये केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे वाहतुकीचे विविध नियम ही समाजाला शिस्त लावण्यासाठी असतात, महाविद्यालयातील तरुणांनी मोबाईलचा कमीत कमी वापर करत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असेही ते याप्रसंगी म्हणाले. व्यासपीठावरून बोलताना प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी महाविद्यालयातील तरुण हे समाजाच्या शिस्तीचा  एक महत्त्वाचा दुवा आहे असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाची विद्यार्थिनी धनश्री गायकवाड महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महिला बालविकास अधिकारी या पदावर निवड झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपले मनोगतामध्ये धनश्री गायकवाड हिने विद्यार्थ्यांनी आपल्याला कमकुवत न समजता स्पर्धा परीक्षेमधील अभ्यासक्रम व मागील परीक्षा प्रश्नपत्रिका या दोन गोष्टींच्या जीवावर कोणतेही क्लास न लावता तुम्ही स्पर्धा परीक्षा मध्ये यश संपादन करू शकता असे ठणकावून सांगितले.

स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे संयम, परिश्रम व सातत्य  या त्रिसूत्रीची जोड असावी लागते असेही तिने नमूद केले. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ. वसुदेव साळुंके रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नवनाथ दळवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वसुदेव साळुंके यांनी केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र जाधव व आभार प्रदर्शन डॉ. नामदेव ढोकळे यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे, अशोकराव रोहमारे, विधिज्ञ संजीव कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.