कोपरगावच्या चिकटे परिवार व स्नेही तर्फे जर्मनीत गणेशोत्सवाचा जल्लोष

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : माईंझ (जर्मनी) परदेशात राहूनही मातृभूमीशी असलेली नाळ जोडून ठेवत कोपरगाव येथील रहिवासी चिकटे परिवार व स्नेही यांनी जर्मनीतील माईंझ येथे श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू केला आहे. तेथे स्थायिक असलेले प्रसाद जगमोहन चिकटे गेल्या दहा वर्षांपासून  श्री गणेशोत्सव साजरा करीत आहेत या शहरात आजूबाजूला भारतीय साऊथ इंडियन व काहीं परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत, दहा दिवसांच्या या सोहळ्याची सुरुवात विधीवत पूजा-अर्चा, मंत्रोच्चार व भक्तिमय वातावरणात करण्यात आली.

श्री गणेशाच्या आगमनाने माईंझ परिसरात भारतीय बांधवात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळ-संध्याकाळ दररोज नित्य नियमाने आरती, भजन, कीर्तन यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बालगोपाळांसाठी खेळ व स्पर्धा, तर महिलांसाठी पारंपरिक उपक्रम असेही कार्यक्रम या कालावधीत रंगणार आहेत.

परदेशात मराठी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने गेली अनेक वर्षे गणेशोत्सव मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा केला जात आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर दररोज होणाऱ्या प्रार्थना व आरत्या यामुळे सर्वांना आपुलकीचा, घरगुती वातावरणाचा अनुभव मिळत आहे.

चिकटे परिवार व स्नेही यांच्यावतीने गणेशभक्तांना सहपरिवार सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला आहे.

Leave a Reply