वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गोदावरी नदीवरील नवीन मोठा पूल खुला करण्यासाठी निवेदन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव शहरालगत असणारा नगर मनमाड महामार्ग अतिशय खराब झालेला असून हजारो वाहनांच्या रांगा या खराब रस्त्यामुळे लागत आहेत. सातत्याने वाहनकोंडी सुरू आहे. शहरातील लहान पुलाचे देखील सुरक्षा कठडे तुटले आहे त्यामुळे धोकादायक स्थिती झाली आहे. 752 जी नगर मनमाड रस्त्यावर असलेल्या मोठ्या पुलावरून वाहतूक कोंडी होत आहे. त्याच शेजारील नवीन पूल तयार असताना तो खुला करून वाहतूक कोंडी सुरळीत होऊ शकते.

मात्र नागरिकांचं एवढे हाल करून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करणे शक्य असताना का रोखले जात आहे. यावरून कोपरगाव शहर भाजपा यांनी सवाल केला आहे, तशी अधिकृत मागणी करणारे निवेदन कोपरगाव तहसीलदार यांना कार्यवाहीसाठी देण्यात आले आहे. सदर निवेदन नायब तहसीलदार श्रीमती प्रफुल्लता सातपुते यांनी स्वीकारले.

वाहतूक कोंडीत अपघात होऊन नागरिकांचे काही बरे वाईट झाल्यावर आपण नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करणार आहे का? यात कुणाची अडचण आहे का? हे प्रशासनाने लक्ष घालावे. एकीकडे वाहतूक सुरू ठेवल्याने अरुंद पुलावरून हजारो वाहने एकाच वेळी जाणे शक्य नाही. अतिशय मोठे खड्डे या रस्त्याला झाले असून अवजड वाहने कासवगतीने धावत आहे त्यामुळे लहान वाहने आणि चाकरमानी यांचे हाल होत आहे. नवरात्र सुरू असल्याने जुनी गंगा देवस्थान येते शहरातील भाविकांना जाता येत नाही. वाहतूक कोंडीने बाहेरील नागरिक देखील त्रस्त आहेत.

आ.आशुतोष काळे यांनी साफ दुर्लक्ष केलेले असल्याने केवळ साधे व्यवस्थापनाचे नियोजन देखील त्यांना जमले नाही. या मोठ्या पुलावर असलेला दिशादर्शक आणि माहिती फलक देखील तुटून गेला आहे. नवीन पुलाला किरकोळ मातीचा भरावा बाजूला करून मुख्य रस्त्याला जोडण्याचा भाग खुला करण्यात आला तर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकतो. यातून नागरिक, प्रवासी, शालेय विद्यार्थी, भाविक भक्त यांची अडचण कमी करता येईल अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा अध्यक्ष विनोद नाईकवाडे, कोपरगाव शहर अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष सलीम पठाण, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष संदीप वाघचौरे, भाजपा युवामोर्चाचे शहर अध्यक्ष सिद्धार्थ साठे, रहीमभाई शेख,सोमनाथ म्हस्के, कैलास नागरे, संतोष साबळे, मुकुंद उदावंत, रोहित कनगरे, दुर्गेश गवळी, राहुल खरात, श्याम शेवते, अल्लाउद्दीन शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply