समता इंटरनॅशनल स्कूलच्या आस्वाद मेस विभागाला आयएसओ मानांकन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : युनायटेड किंग्डम येथील आंतरराष्ट्रीय मानक संघटनेकडून (इंटरनॅशनल स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन) समता इंटरनॅशनल स्कूलमधील मेस विभागाला गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली व अन्न आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत आयएसओ 9001 व 22000 असे दर्जेदार व्यवस्थापन पद्धत व फूड सेफ्टी दर्जा प्रमाणित मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले असून समता इंटरनॅशनल स्कूलच्या मेस व किचन विभागाच्या कार्यकारी विश्वस्त सौ.सुहासिनी कोयटे यांनी आयएसओचे लिड ऑडिटर कमलेश कोते यांच्या हस्ते स्विकारले.

गेल्या वर्षी इन्फोसिसच्या विश्वस्त सुधा मूर्ती यांनी समता इंटरनॅशनल स्कूलला भेट दिली असता स्कूलची माहिती घेतली आणि स्कूलच्या मेसमधील रुचकर व स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. त्यावेळी त्यांनी ही जेवणाचे कौतुक केले आणि केलेल्या सुचना आम्ही अमलात आणल्या. मेसमधील जेवणाला असलेल्या उच्च दर्जामुळे हे आयएसओ मानांकन मिळाले असल्याचे समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती संदीप कोयटे यांनी सांगितले.

समता इंटरनॅशनल स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण देत खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल बनली आहे. समताचा विद्यार्थी हा शिक्षणाबरोबर शारीरिक दृष्ट्या सुदृढ व्हावा त्यासाठी शारीरिक विभागांतर्गत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे आयोजन नेहमीच करत असतो. तसेच विद्यार्थ्यांसाठी आस्वाद मेस स्कूलमध्ये चालविली जाते. या मेसमध्ये दररोज १२०० विद्यार्थ्यांचे स्वादिष्ट व रुचकर जेवण बनविले जाते.

दररोज जेवणामध्ये ऑरगॅनिक खतांचा वापर केलेल्या व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रोटीन युक्त पालेभाज्या, वेलीच्या भाज्या, वेगवेगळी कडधान्ये जेवणात वापरल्याने जेवणाचा स्वाद व रुचकरपणा हा अधिक वाढतो. त्यामुळे सौ.सुहासिनी कोयटे यांना विद्यार्थ्यांचे पालक अन्नपूर्णा या नावाने संबोधतात. समताच्या मेसविषयी पालक नेहमीच शाळा व्यवस्थापन समितीकडे तक्रार करत असतात की, ‘आमचा पाल्य घरी खात नसलेली कारले, दोडका, भोपळा या भाज्या मेसमध्ये आवडीने खातात. समताच्या मेसमध्ये जेवल्यानंतर त्याला घरचे जेवण आवडत नाही.

मेस व किचन विभागाच्या कार्यकारी विश्वस्त सौ.सुहासिनी कोयटे म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकन समता इंटरनॅशनल स्कूलच्या मेस विभागाला प्राप्त झाले आहे. या कौतुकास्पद कामगिरीचे सारे श्रेय मेसमध्ये काम करणाऱ्या सर्वांचेच आहे. तसेच समता स्कूलच्या हॉस्टेलमधील मुलांना ८५ रुपये लिटर गीर गाईचे दूध तर हिवाळ्यात खारीक खोबऱ्याचे लाडू आणि सणावाराच्या दिवशी सर्वच विद्यार्थ्यांना पुरणपोळी, श्रीखंड तर आमरस या प्रकारचे गोड जेवणही दिले जाते. भारतात उत्तम प्रतीचा समजला जाणारा शिवर, सरबती या गव्हाच्या चपात्या बनविल्या जातात तर मदर चॉईस, कोलम यांसारखा ब्रँडेड तांदूळ देखील वापरला जातो. जेवणाची गुणवत्ता राखण्यात वाहतूक विभागाचे विजय घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांचा देखील मोलाचा वाटा आहे.

प्रसंगी आयएसओ लिड ऑडिटर कमलेश कोते यांचा सत्कार समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्तविक उपप्राचार्य समीर अत्तार यांनी केले. मेस विभागातील कर्मचाऱ्यांचे समता परिवाराच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. या वेळी समता स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, प्राचार्या हर्षलता शर्मा, उप प्राचार्य समीर अत्तार, मेस इन्चार्ज तेजस्वी नागरे, आचारी कौशल्या शिवाळ, महाराज लोकेंद्र जोशी, मदतनीस उषा थोरात, लता बागुल, अनिता बिडवे, जयश्री चव्हाणके, वैशाली बिडवे, ज्योती बिडवे, ज्योती मोरे, रेखा मानकर, महेश शिंदे, मीना डांगे, विद्या धुमाळ, छाया मेहरे, प्रमिला शेरे, भारती कंदे, रंजना बागुल, गीता बिडवे, शारदा सोनवणे, सुनिता सांगळे आदींसह विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मेस इन्चार्ज तेजस्वी नागरे यांनी मानले.