केवळ गुण पत्रिकेवरील गुण महत्वाचे नसून बहुआयामी व्यक्तिमत्व जरूरी – डाॅ. महेंद्र चितलांगे

संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये टेक-मंत्रा २ के २३ या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १२ : स्पर्धेतील यश अपयश महत्वाचे नसुन स्पर्धेत भाग घेणे म्हणजेच आत्मविश्वास प्रदर्शित करणे असा आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वच स्पर्धकांचा आत्मविश्वास हा त्यांना या महाकाय विश्वातील वेगवेगळी आव्हाने पेलण्यासाठी पुरक ठरतो. स्पर्धेतुन बहुआयामी व्यक्तिमत्व घडते. म्हणुन सध्याच्या काळात केवळ गुण पत्रिकेवरील गुण महत्वाचे नसुन स्वतःमधिल विविध कौशल्येही तितकीच महत्वाची आहेत. म्हणुन विध्यार्थ्यांनी  केवळ गुणार्थी न होता बहुआयामी व्यक्तिमत्व घडवावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षण  मंडळाचे (एमएसबीटीई) सचिव डाॅ. महेंद्र  चितलांगे यांनी केले.

संजीवनी के.बी. पी. पाॅलीटेक्निकने रोटरी क्लब कोपरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयएसटीई स्टुडन्टस् चाप्टर अंतर्गत आयोजीत केलेल्या राष्ट्रीय  पातळीवरील तांत्रिक परीसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी डाॅ. चितलांगे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुपऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भुषविले.

यावेळी रोटरी क्लब कोपरगांव सेंट्रलचे अध्यक्ष विरेश अग्रवाल, सचिव ए. डी. अंत्रे, संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, संजीवनी डी. फार्मसीचे प्राचार्य डाॅ. डी. एन. पाटील, प्राचार्य ए. आर. मिरीकर, समन्वयक प्रा. डी. ए. पाटील, आयएसटीई स्टुडन्टस् चाप्टरच्या प्रमुख प्रा. एस. सी. भंगाळे, सर्व विभाग प्रमुख व डीन्स व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी प्राचार्य मिरीकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून संजीवनी पाॅलीटेक्निकच्या प्रगतीचा आलेख मांडला. याच बरोबर या राष्ट्रीय  पातळीवरील तांत्रिक परीसंवादामध्ये टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन, कॅड वार, ब्रीज मेकिंग, सर्फ अँड प्रेझेंट आणि पोस्टर प्रेझेंटेशन अशा  पाच विभागातील स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह  इतर राज्यातील पाॅलीटेक्निक व डी. फार्मसी संस्थामधुन सुमारे ६५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे, असे सांगीतले.

विरेश अग्रवाल यांनी सांगीतले की, जगात रोटरीचे ४६००० क्लब्ज असुन फिरते चाक हे रोटरीचा लोगो आहे. ते सतत फिरते असुन मदत कार्यासाठी हा क्लब जगात आघाडीवर आहे. तसेच विद्यार्थ्यांनी  सतत स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवुन आपले विचार वृध्दींगत करावे.

डाॅ. चितलांगे पुढे म्हणाले की, एवढी मोठी स्पर्धा घेणे सोपे नसते परंतु संजीवनी पाॅलीटेक्निक मध्ये तशी  क्षमता असल्याचे तसेच कॅम्पस मध्ये प्रवेश केल्यावर सर्व परीसर विवधि वृक्ष व फुलांनी बहरलेला दिसतो असे सांगीतले. येथिल विध्यार्थ्यांना पक्षांची उपमा देत त्यांना येथे स्वच्छंद विहार करायला मिळत असल्याने ते भाग्यवान आहेत. अशा  स्पर्धांमधुन विद्यार्थ्यांमध्ये अनेक कौशल्य विकसीत होवुन त्यांना चांगल्या कंपन्या नोकरीसाठी प्रथम पसंती देतात.

विध्यार्थी व शिक्षकांच्या प्रगतीसाठी एमएसबीटीई विविध उपक्रमांसाठी अर्थसहाय्य करते. यात संजीवनी पाॅलीटेक्निकची क्षमता ओळखुन प्रथम प्राधान्य दिल्या जाते. विध्यार्थ्यांनी  कोणत्याही स्पर्धेत अपयशाची  चिंता न करता अपयशाकडे  पुढील स्पर्धेसाठी एक सधीं मानावी. मोठे ध्येय ठेवुन विध्यार्थ्यांनी  कम्फर्ट झोन मधुन बाहेर पडून ध्येय गाठण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल  रहावे, असे डाॅ. चितलांगे यांनी शेवटी सांगीतले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना अमित कोल्हे यांनी सांगीतले की, विध्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमता सिमित करू नये. जर तुम्ही विचार केला की तुम्ही करू शकता, तर एखादी गोष्ट तुम्ही निश्चितच करू शकता, या उलट तुम्ही जर असा विचार केला की तुम्ही नाही करू शकत, तर तुम्ही नाहीच करू शकणार. म्हणुन सकारात्मक विचार हाच आपणास प्रगतीकडे घेवुन जाईल.

पाॅलीटेक्निकच्या दुसऱ्या वर्षातील  संस्कृती पाटील व आकांक्षा मुठे यांनी अस्खलीत इंग्रजी मधुन सुत्रसंचलन केले. त्यांच्या या सुत्रसंचालनाचे कौतुक करीत डाॅ. चितलांगे यांनी त्या दोघींचाही सत्कार केला. प्रा. पाटील यांनी आभार मानले.