कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या आदेशान्वये महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यांनी जानेवारी २०२६ पूर्वी आपल्या राज्यस्तरीय सहकार धोरणांची आखणी करणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाचे केंद्रिय सहकार मंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार गठीत झालेल्या उच्चस्तरीय समितीत (High Level Committee) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची निवड करण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, “सहकार से समृद्धी” या मा.केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेनुसार सहकार क्षेत्राच्या माध्यमातून भारताच्या जीडीपी वाढीमध्ये कसा हातभार लावता येईल? यावर ही समिती काम करणार आहे. सहकारी संस्थांमधील परस्पर सहकार्य वाढविणे, देशभरातील विविध राज्यातील सहकारी संस्थांचा कायदा व कार्यपद्धती याचा अभ्यास करून ही समिती केंद्र शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे. तसेच सहकार क्षेत्रात सहकारातील तंत्रज्ञानातील तज्ञांशी चर्चा करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे. याबाबत केंद्र व राज्य शासन सहकार खात्याला योग्य ते बदल सुचविणार आहे.

तसेच मा.अमित शहा यांनी देशभरातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना व्यवसाय करण्यासाठी ज्या प्रमाणे प्रोत्साहन दिलेले आहे. त्या प्रमाणे सर्वच संस्थांच्या माध्यमातून व्यवसाय वाढ करून समृद्ध भारत कसा घडविता येईल? याचे देखील धोरण या समिती मार्फत ठरविण्यात येणार आहे.

जगभरात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे होत असताना महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली होती. या सहकार परिषदेला १६ देशातील प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेच्या यशस्वी नियोजनासाठी राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांनी राज्यभर झंझावाती दौरे करून सहकार दिंडीच्या माध्यमातून राज्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये नवचैतन्य, उत्साह निर्माण केला.

शिर्डी येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला राज्यातील १२ हजाराच्या वर सहकारी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. अशा विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाकडून ही निवड झाली असल्याचे राज्य फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी सांगितले.

या निवडीमुळे राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राज्यभरातून काका कोयटे यांचे अभिनंदन केले जात आहे. ही निवड महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीसाठी गौरवाचा क्षण ठरली आहे. या निवडीमुळे राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
