नगर-मनमाड महामार्गावरील धोकादायक खड्ड्यांनी घेतला एकाचा जीव

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : शहरातुन जाणाऱ्या नगर-मनमाड राज्य महामार्गावरील धोकादायक खड्ड्यांनी आणखी एकाचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. येवला नाका परिसरातील मोठ्या खड्ड्यात घसरून पडून मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाखाली सापडल्याने आदित्य कैलास देवकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी खड्ड्यातील पाण्यात बसून रास्ता रोको व भिक मांगो आंदोलन करींत शासनाला धारेवर धरले. जो पर्यंत खड्डे बजावले जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पवित्रा घेतला. प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी केली आहे.

शहरातील इंदिरापथ येथील रहिवासी आदित्य देवकर वय 29  हे मंगळवारी रात्री साडे दहा वाजता दुचाकीवरून जात असताना शिरोडे ऑटोमोबाईलसमोर असलेल्या खोल खड्ड्यात त्यांची मोटारसायकल घसरली. दरम्यान मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. अपघात एवढा भीषण होता की आदित्य यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी शोकाकुल वातावरणात आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, आज सकाळी विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको व ठिय्या दिला. रस्त्यावरील खड्डे, सर्वत्र अंधाराचे साम्राज्यमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरीही संबंधित यंत्रणा तोंडावर बोट ठेवून चुप्पी साधत असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.

 अधिकाऱ्याना राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दिसत नाही का? शासन व संबंधित खाते, टोल वसुली करणारे आणखी किती लोकांचे बळी घेणार? असा सवाल यावेळी केला गेला. आत्तापर्यंत या रस्त्यावर अनेकांचे अपघात झाले त्यात अनेकांचा बळी गेला. काहींना कायमचे अपंगत्व आले. तरी शासनाचे या रस्त्याकडे सपशेल दुर्लक्ष आहे. नागरिकांच्या भावनांचा किती अंत पाहणार असा तीव्र रोष यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. दुपारी उशिरा रस्त्यावरील खड्डा बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले होते.

Leave a Reply