गावोगावी साखळी उपोषणे सुरू, टप्या टप्याने गावे कडकडीत बंद

शेवगाव प्रतिनिधी, दि. १ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवली सराटा येथे मराठा भूषण मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यांना चोहो बाजूने सर्व स्थरावर पाठींबा देण्याकरीता शेवगाव तालुका पेटून उठला आहे. शेवगाव तालुक्यातील ११३ गावांपैकी बहुतेक सर्वच गावांनी फलक लावून पुढार्‍यांना गाव प्रवेशाची बंदी घातली आहे.

टप्या टप्याने गावे कडकडीत बंद पाळत आहेत. पदाधिकारी आपल्या पदाचे राजीनामे देत आहेत. गावोगावी साखळी उपोषणे सुरू आहे. साखळी उपोषणासाठी नागरिकांची स्पर्धा लागली असून नागरिक पाळी पाळीने उपोषणास बसत आहेत. विविध जाती धर्म व पक्षीय गट तट बाजूला ठेवून लोक उपोषण स्थळी येऊन मराठा आरक्षणास पाठिंबा देत आहेत.

तालुक्यातील शिक्षण संस्थांनी देखील मुख्यमंत्र्यांना हा तिढा सोडवण्याचे आवाहन करून एकेक दिवस आपल्या संस्थेची विद्यालये बंद ठेवून लाक्षणिक बंद पाळत आहे. अशा पद्धतीने तालुक्यातून चोहो बाजूने व विविध स्थरातून तालुका मराठा आरक्षणासाठी पेटला आहे. तालुक्यातील गावांच्या प्रवेशद्वारी तसेच प्रमुख रस्त्यावर पुढाऱ्यांना प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले असून आता नाही तर कधीच नाहीं ‘चुलीत गेला पक्ष आता एकच लक्ष’ असे भावनिक घोष लिहून एकीचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

शेवगाव, ढोर जळगाव, भातकुडगाव फाटा, लखमापुरी अशा अनेक गावात साखळी उपोषण सुरू असून राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शेवगाव येथे उपोषण स्थळी येऊन उपस्थिती लावली. येथील सकल वडार समाजाने, धनगर समाजाने तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी ही अनेक ठिकाणी उपोषणकर्त्यांना भेट देऊन सकल मराठा समाजाच्या रास्त मागणीला पाठिंबा दिला आहे.

दहिगावने येथील जनता शिक्षण प्रसारक संस्थेचे, माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी तसेच शेवगावच्या एफडीएल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड शिवाजी काकडे यांनी देखील आपल्या शिक्षण संस्थेची विद्यालये आज बंद ठेवली आहेत. रांझणी गावानेही कडकडीत बंद पाळला.  

 तालुक्यातील सालवडगावचे सरपंच अण्णासाहेब रुईकर व उपसरपंच यमुना भापकर यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमचा भाऊ मनोज जरांगे पाटील जीवन मरणाची लढाई लढत असताना आम्ही या पदावर राहणे संयुक्तिक वाटत नाही. म्हणून आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या शेकडो सदस्यांनी या अगोदर आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.