आमदार काळेंनी जिल्हाधिकाऱ्यांना घडवला खराब रस्त्यांचा प्रवास

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : आज जशी अवस्था झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्त्याची (राज्य मार्ग ६५) झाली आहे तशीच अवस्था यापूर्वी पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या सात किलोमीटर रस्त्याची माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात झाली होती. त्यावेळी आमदार अशोकराव काळे यांनी तात्कालीन जिल्हाधिकारी डॉ.संजीव कुमार व तात्कालीन पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांना स्वत:च्या चार चाकीतून पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या सात किलोमीटरच्या रस्त्याचा प्रवास घडवला होता. त्यावेळी त्यांना सात किलोमीटरच्या प्रवासासाठी लागलेल्या पावून तासात रस्त्याची विदारक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी डॉ.संजीव कुमार यांनी पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या सात किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल १४ कोटी निधी मंजूर केल्यामुळे हा प्रश्न सोडविण्यात आमदार अशोकराव काळे यशस्वी झाले होते.

तोच पवित्रा घेवून आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आ.आशुतोष काळे यांनी देखील जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना त्यांच्या चार चाकीतून झगडे फाटा ते वडगाव पान कोपरगाव तालुका हद्दीपर्यंतचा प्रवास घडवून संपूर्ण रस्त्याची अवस्था दाखवायची होती. परंतु पोहेगाव ओलांडून पुढे जाई पर्यंतच जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्याच्या परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे त्यांनी पुढे न जाता परत फिरण्याचा निर्णय घेतला व राज्य मार्ग ६५ च्या अडचणी लवकरात लवकर दूर करा अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.

कोपरगाव मतदार संघातील अत्यंत महत्वाचा व मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या वाहनांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या राज्य मार्ग ६५ अर्थात झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याच्या दुरुतीचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. या रस्त्याला १० कोटी निधी देवूनही भक्कम पाया नसल्यामुळे हा रस्ता टिकला नाही त्यामुळे हा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा होणे अत्यंत गरजेचे आहे.

तसेच सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी या रस्त्याच्या सुरु असलेल्या सावळीविहीर कोपरगाव रस्त्याचे पुणतांबा फाटा व बेट नाका या ठिकाणी जमीन अधिग्रहणाचे काम प्रलंबित असल्यामुळे काम रखडले असून त्या मुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या परतीच्या पावसामुळे या वाहतूक कोंडीत अजूनच भर पडली आहे. त्यामुळे नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे हि वस्तुस्थिती जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आ.आशुतोष काळे यांनी दाखविल्यामुळे नागरीकांना किती त्रास सोसावा लागत असेल याची जिल्हाधिकाऱ्यांना जाणीव झाली.

राज्यमार्ग ६५ वरील झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर बाराही महिने मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. यामध्ये जड वाहतुकीचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो. कोपरगाव मतदार संघाच्या लगतच जगप्रसिद्ध शिर्डीचे श्री साईबाबा देवस्थान असून या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यक्रम व उत्सव सुरु असल्यामुळे शिर्डी संस्थानच्या सुरक्षेच्या दृष्टीने व देश विदेशातून येणाऱ्या साईभक्तांना या वाहतुकीचा त्रास होवू नये यासाठी पूर्वीचा प्रमुख नगर-मनमाड राज्यमार्ग व सध्याचा एन.एच.७५२ जी वरून उत्तरेकडून शिर्डीमार्गे दक्षिणेला येणारी सर्व वाहतूक पुणतांबा फाटा मार्गे याच झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता अर्थात राज्यमार्ग ६५ वरून मागील अनेक वर्षापासून वळविली जात आहे.

त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वाहनांची वर्दळ या मार्गावरून होत असल्यामुळे हा रस्ता अतिशय खराब झाला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीसाठी ईकेवायसीची अट शिथिल करावी अशी मागणी यावेळी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे  केली.   

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाला राज्यमार्ग ६५ व राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी या रस्त्याच्या सुरु असलेल्या सावळीविहीर कोपरगाव रस्त्याचे पुणतांबा फाटा व बेट नाका या ठिकाणी रखडलेले कामाच्या अडचणी सोडवून तातडीने काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी कार्यकारी अभियंता एस.आर.वर्पे, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार महेश सावंत, उपकार्यकारी अभियंता वर्षराज शिंदे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी ए.एल. जमाले, अभियंता पी.पी. गायकवाड, अभियंता अक्षय शिंदे, व्ही. व्ही. पालवे, आर पी गंभीरे, आर.ए.जाधव, व्ही. व्ही. माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply