कोपरगांव प्रतिनिधी, दि. १२ : फार्मसी अभ्यासक्रमामध्ये जागतिक मानकांप्रमाणे आधुनिक अभ्यासक्रमाचा समावेश आगामी काळात केला जाईल. भारत देशाने जगात जेनेरिक औषधे पुरविण्यासाठी आघाडी घेतली असुन यामुळे औषधनिर्माण शास्त्रात भारताची मान उंचावली आहे. फार्मासिस्टस् (औषध शास्त्रज्ञ) साठी जगात भरपुर रोजगाराच्या संधी आहेत. या संधी प्राप्त करण्यासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) जागतिक दर्जाचे फार्मासिस्टस् तयार करण्यासाठी अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करीत आहे, असे प्रतिपादन पीसीआयचे अध्यक्ष जसुभाई चौधरी यांनी केले.

संजीवनी फार्मसी अंतर्गत एम. फार्मसी., बी. फार्मसी व डी. फार्मसीला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे स्वागत (दीक्षारंभ २०२५) तसेच फार्मसी महाविद्यालयाने प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी परीयोजना अंतर्गत नव्याने सुरू केलेल्या जेनेरिक मेडिकल स्टोअर्सच्या उद्घाटन कार्यक्रमात चौधरी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे (एसजीआय) अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथिल ग्लॅनमार्क फार्माचे जनरल मॅनेजर प्रशांत पाटील, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नंस डॉ. राजन शेंडगे, फार्मसी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. विपुल पटेल व डी. फार्मचे प्राचार्य डॉ. निलेश पेंडभाजे उपस्थित होते. नवोदित विद्यार्थी, तसेच सध्याचे विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती उल्लेखनिय होती.

प्रारंभी डॉ. पटेल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून संजीवनी फार्मसी माहाविद्यालयाने विविध क्षेत्रात स्थापित केलेल्या कीर्तिमानांची माहिती दिली. संशोधनावर भर देताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी या कार्यासाठी नेहमी पुढे यावे. कारण भारत सरकारच्या विविध विभागांनी संशोधन कार्यासाठी रू २ कोटींचा निधी मंजुर केला आहे. एसजीआयचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी फार्मसी महाविद्यालय विविध उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणुन शैक्षणिक संस्थेद्वारे ‘जेनेरिक मेडिकल स्टोअर्स’ सुरू करणारे संजीवनी फार्मसी महाविद्यालय हे देशातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.

चौधरी पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कधीही न्युनगंडता बाळगु नये. प्रत्येक सुट्टीत कोणत्याही मेडीकल क्षेत्रात काम करा, त्याचा फायदा शिक्षण घेत असताना होईल आणि फार्मसी संदर्भातील संकल्पना स्पष्ट होतील. ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करा. आज जसे दीक्षारंभ २०२५ कार्यक्रमासाठी बोलविले तसे चार वर्षानंतर दिक्षांत समारंभासाठी बोलवा, असेही चौधरी शेवटी म्हणाले.
यावेळी प्रशांत पाटील म्हणाले की, ही भूमी संजीवनी विद्येचे जनक श्री शुक्राचार्य व श्री साईबाबांची आहे. येथे संजीवनीतुन विद्यार्थ्यांना खरोखरच संजीवनी मिळत आहे. प्रत्येक शिक्षक हा देवाप्रामणे असतो त्याचा फायदा घ्या.

अध्यक्षस्थानावरून बोलताना नितिनदादा कोल्हे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रत्येक क्षेत्रात भाग घ्यावा. मार्गदर्शनासाठी येथिल शिक्षक सक्षम आहेत. विद्यार्थ्यांनी आई वडीलांचे स्वप्ने पुर्ण करावित. पालकांना उध्देशून ते म्हणाले की, आपले पाल्ये येथे सुरक्षित आहेत. मात्र त्यांच्या उत्कर्षासाठी पालकांनी सहकार्य करावे.


