कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : आम्ही समाजाच्या अडचणीत सदैव उपस्थित आहोत “आम्ही सत्तेत असो वा नसू, समाजाशी आमची बांधिलकी कायम आहे, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कधीही मागे हटत नाही देशात, राज्यात आणि जिल्ह्यात कमळ असून, आगामी नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव नगरपालिकेत बहुमताने भाजपाचा नगराध्यक्ष द्यायचा व सर्व नगरसेवक विजयी करून शहराचे उज्वल भविष्य घडवायचे असल्याने कमळच विजयी करा असे प्रतिपादन युवानेते विवेक कोल्हे यांनी केले. येत्या दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मधील कॉर्नर सभेत युवा नेते विवेक कोल्हे बोलत होते.

स्व. शंकरराव कोल्हे यांनी शहराची शांतता कधीही भंग होऊ दिली नव्हती. जातीय तेढ निर्माण होऊ दिली नाही. गौतम बुद्धांची पंचधातूची मूर्ती, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा, तसेच कोपरगाव तालुक्यातील विविध भागांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची उभारणी या सर्व कामांद्वारे शांततेची आणि सामाजिक ऐक्याची परंपरा त्यांनी टिकवली आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून चार कोटी रुपयांची वैद्यकीय मदत कोपरगाव तालुक्यातील गोरगरीबांसाठी मिळवून दिल्याचे समाधान वाटत असल्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी सांगितले.

युवानेते विवेक कोल्हे यांनी सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याचे सांगत माऊली मंगल कार्यालयाच्या कामाला प्रथम प्राधान्य देण्याची ग्वाही दिली. स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या कार्यकाळात १९९५ साली बांधण्यात आलेले हे माउली मंगल कार्यालय सर्वसामान्यांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, प्रभाग क्रमांक १३ मधील दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिल्यास हे काम तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ते म्हणाले की, इतरत्रची मंगल कार्यालये सर्वसामान्यांना परवडत नाहीत, त्यामुळे लग्न समारंभ किंवा इतर अडचणी अशा अनेक गोष्टी माऊली मंगल कार्यालयाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतात.

गेल्या चार-पाच वर्षांत समाजात जाणूनबुजून तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत असून दोन समाजांना भडकवून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न काही जण करतात, परंतु स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे आणि मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी समाजासमोर नेहमीच आदर्श ठेवला आहे.

२०१९ मध्ये अल्पशा मतांनी पराभव पत्करावा लागला असला तरी समाजसेवेची वाटचाल थांबवली नाही, असे विवेक कोल्हे यांनी सांगितले. चाळीस वर्षांपासून प्रतिनिधित्व न मिळालेल्या समाजासाठी स्वर्गीय करीम भाई कुरेशी यांचे चिरंजीव आरिफ भाई कुरेशी यांना उपनगराध्यक्ष करून न्याय दिला. परिसरातील उर्दू शाळा, कब्रस्तान, जातीचे दाखले, करपट्टी यासह अनेक स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

मी २४ वर्षे नगरपालिकेकडे वळूनही पाहिले नाही असे काही जण सांगतात, परंतु याउलट पराग संधान हे पूरस्थिती, अतिवृष्टी, नागरिकांच्या सुखदुःखात नेहमीच सोबत राहिले.नऊ वर्षांपूर्वी थोड्या मतांनी पराभूत झालेले पराग संधान यांनी संपूर्ण प्रभागात नातेसंबंध जपून आपले कार्य सिद्ध केले आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील सर्व धार्मिक कार्यक्रमांना कोल्हे कुटुंबीय आणि पराग संधान यांची उपस्थिती कायम राहते. मावळा ग्रुपच्या माध्यमातून फिरोजभाई पठाण आणि दत्तनगरमधील युवक नेतृत्व असलेल्या स्वप्निल मंजुळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात तरुणांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन सामाजिक उपक्रम राबवले.

निलोफर फिरोज पठाण यांनीही या उपक्रमात योगदान दिले. मुस्लिम समाजाच्या प्रत्येक सणावारात सहभागी होण्याची परंपरा देखील स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या काळापासून सुरू आहे. सभेच्या शेवटी विवेक कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक १३ मधील तिन्ही उमेदवार बहुमताने निवडून आल्यास या भागात फक्त विकास कामे होतील. एकही दंगल होणार नाही अशी ग्वाही दिली असता टाळ्यांचा कडकडाट झाला.


