कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : आपल्या नावात ‘समता’ असल्याचे सांगणाऱ्या काका कोयटे यांनी जर खरोखरच समतेचे विचार पाळले असते तर आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या वाचनालयाला ‘समता स्टडी सेंटर’ असे नाव देण्याऐवजी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय असे नाव दिले असते. गेली चोवीस वर्षे काका कोयटे कोणत्याही सामाजिक न्यायाच्या लढ्यात दिसले नाहीत. मात्र निवडणुका आल्यानंतरच जनतेची दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांनी पुढे येतात, त्यामुळे काका कोयटे यांचे डॉ. आंबेडकरांवरील प्रेम हे फक्त दिखाव्यापुरते असून शहरातील आंबेडकरी जनता त्यांना चांगल्या प्रकारे ओळखून आहे, काका कोयटे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील प्रेमाचा फक्त दिखावा करतात. त्यांच्या नावात समता असली तरी वागण्यात विषमता दिसून येते,अशी टीका जितेंद्र रणशूर यांनी केली आहे.

२५ वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीनंतरच काकासाहेब कोयटे यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली असून महापरिनिर्वाण दिन, जयंती किंवा धम्मचक्र परिवर्तन दिनाला ते कधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ दिसले नाहीत, असा आरोप जितेंद्र रणशूर यांनी पत्रकार परिषदेत केला.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन विवेक कोल्हे यांनी पहिल्या कार्यकाळातच इतिहास घडवत दलित समाजातील रमेश घोडेराव यांना व्हाइस चेअरमन पदाचा सन्मान दिला. परंतु काका कोयटे चालवत असलेल्या समता पथसंस्थेत आजपर्यंत दलित समाजातील व्यक्तीला एकदाही व्हाइस चेअरमन पद मिळाले नाही.

विरोधी उमेदवार काका कोयटे व आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ निवडणूक आयोगाच्या विरोधात काळ्या फिती लावून आंदोलन करत निवडणूक कोल्हे गटामुळे पुढे ढकलली गेली असा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्रातील इतर 24 नगरपालिका निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातील बारामतीची निवडणूकही आहे.

मग फक्त कोपरगावातच भाजप व लोकसेवा आघाडीवर आरोप का? असा सवाल रणशूर यांनी उपस्थित केला. विरोधी उमेदवाराच्या अर्जात त्रुटी असूनही निर्णय अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही, त्यामुळे त्या उमेदवाराने संविधानाने दिलेल्या हक्कानुसार न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, हे सत्य विरोधक जाणूनबुजून लपवत असल्याचेही त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या उमेदवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ काळ्या फिती लावून न्यायालयाच्या आदेशाविरोधात आंदोलन केले आणि या कृतीतून त्यांनी न्यायालय व संविधानाचा अपमान केला आहे, असे रणशूर यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रातील 24 नगरपालिका आणि जिल्ह्यातील पाथर्डी, नेवासा, कोपरगाव आणि देवळाली प्रवरा या चार नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, तरीही विरोधक नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरवत आहेत. भारतीय जनता पक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने या दिशाभूल करणाऱ्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रणशूर यांनी सांगितले की, २ डिसेंबरला निवडणुका पार पडल्या असत्या, तरी मतमोजणी २१ डिसेंबरलाच झाली असती. मात्र विरोधक नागरिकांमध्ये गैरसमज पसरवून चुकीच्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. त्यांना माहिती आहे की, कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत होणार आहेत आणि येथे भारतीय जनता पक्ष व लोकसेवा आघाडीची सत्ता येणार आहे. नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पराग संधान मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.


