कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या स्थापनेला यंदा ३५ वर्षे पूर्ण झाली असून, या कालावधीत राज्यातील सहकारी पतसंस्थांचा विश्वासार्ह आधार म्हणून राज्य फेडरेशनने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. फेडरेशनच्या एकूण प्रवासातील तब्बल १८ वर्षे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण असल्याचे मत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा ३५ वा वर्धापन दिन राज्य फेडरेशनच्या आढावा बैठकीत अध्यक्ष काका कोयटे व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

राज्य फेडरेशनच्या स्थापनेपासून संचालक, सहसचिव, महासचिव ते अध्यक्ष असा प्रवास करताना राज्यभरच नव्हे, तर देश-विदेशात सहकारी चळवळीतील असंख्य सहकारी मिळाले, हीच माझी खरी संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था म्हणून गेली ३५ वर्षे राज्य फेडरेशन विश्वासार्हपणे कार्यरत असल्याचेही काका कोयटे यांनी सांगितले.

यावेळी राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा म्हणाले की, राज्य फेडरेशनने काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील १६ हजारांहून अधिक सहकारी पतसंस्थांना आर्थिक शिस्त लावण्याचे महत्त्वपूर्ण काम करून राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळ बळकट बनविली आहे.

तर उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी यांनी सांगितले की, काका कोयटे यांच्या सक्षम नेतृत्वामुळे सहकारी पतसंस्था चळवळ अधिक मजबूत झाली आहे. सहकारी पतसंस्थांच्या विविध समस्या व मागण्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करत आंदोलने व मोर्चे काढण्यात आले. त्यात आरबीआय बँकेवरील राज्य फेडरेशनचा मोर्चा विशेष उल्लेखनीय ठरला.

यावेळी राज्य फेडरेशनचे संचालक दादाराव तुपकर, राजूदास जाधव, सुदर्शन भालेराव, चंद्रकांत वंजारी, डॉ. अंजली पाटील, सुरेश पाटील, धनंजय तांबेकर, नारायण वाजे, शरद जाधव, भास्कर बांगर, डॉ. रवींद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुरेखा लवांडे, पंडितराव देशमुख यांच्यासह महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील सहकारी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


