आत्मा मालिक ध्यानपीठ हे कोपरगावचे भूषण – स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : आत्मा हाच जगात सर्वश्रेष्ठ आहे. ध्यानाच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती करता येते. माणसाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलता येतो. आयुष्य सकारात्मक बनते. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ येथे आत्मा मालिक ध्यान योग मिशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. या ठिकाणी देश-विदेशातील असंख्य भाविक ध्यान धारणा करण्यासाठी येत असतात. हे अध्यात्मिक केंद्र कोपरगाव तालुक्यात आहे याचा आम्हा सर्वांना निश्चितच अभिमान आहे, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ येथे चैत्र महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले असून, या चैत्र महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थित राहून संत-महंतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी भाविकांशी संवाद साधला. तसेच त्यांच्यासमवेत महाप्रसादाचा लाभ घेतला. 

याप्रसंगी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, परमपूज्य सदगुरू आत्मा मालिक माऊलींच्या पावन सानिध्यात व अनेक संत, महंतांच्या उपस्थितीत कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठमध्ये सहा दिवसीय चैत्र महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. या चैत्र महोत्सवाच्या रूपाने विज्ञान, आरोग्य, अध्यात्म व ध्यान यांचा संगम असणारी एक महाकुंभमेळ्याची पर्वणीच भाविकांना लाभली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव दूर करण्यासाठी आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी ध्यान योगाची नितांत आवश्यकता आहे.

ध्यान योग ही निरोगी आणि आरामदायी जीवनशैलीची गुरुकिल्ली मानली जाते. सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वोत्तम जीवन शैलीसाठी ध्यान धारणा करणे गरजेचे आहे. ध्यान योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदेही आहेत. त्यामुळे माणसाचा जीवनाकडे व प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. एकूणच आयुष्य खूप सकारात्मक होते. आत्म्याच्या पूजनाने सर्व देवदेवतांचे पूजन होते. मात्र, त्यासाठी ध्यानाची आवश्यकता आहे. ध्यानाच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती करता येते, असे त्यांनी सांगितले. 

जागतिक कीर्तीचे आत्मा मालिक ध्यानपीठ कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात असून, या ठिकाणी ध्यानधारणा करण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातूनही भाविक-भक्त मोठ्या संख्येने येत असतात. या ठिकाणी दरवर्षी विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. आत्मा मालिक ध्यान योग मिशनच्या वतीने आत्मा मालिक ध्यानपीठ येथे गेल्या तीन वर्षाच्या खंडानंतर परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊली व सकल आत्मा मालिक संतपीठाच्या सानिध्यात १ एप्रिलपासून सहादिवसीय चैत्र महोत्सवाचे भव्यदिव्य आयोजन भक्त परिवारासाठी करण्यात आले आहे.

या चैत्र महोत्सवात काकड आरती, मौन ध्यान, गुरुयाग, हरिपाठ, प्रवचन, सत्संग, कीर्तन, अनुष्ठान, कलश यात्रा, दिंडी सोहळा, महाप्रसाद तसेच सर्व भाविकांच्या सेवेसाठी आत्मज्ञानपर आधारित विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने, संत-महंतांचे प्रवचन तसेच महोत्सवादरम्यान दररोज विविध आजारांची तपासणी व मोफत उपचार शिबीर आयोजित केले आहे. याचा भाविक-भक्तांना मोठा फायदा होत आहे, असे सांगून स्नेहलताताई कोल्हे यांनी चैत्र महोत्सवाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले.

आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांच्या कार्याचा आढावा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांनी संत-महंतांचा सन्मान करण्याबरोबरच धार्मिक कार्यासाठी नेहमीच सहकार्य केले. स्व. कोल्हेसाहेबांच्या मृत्यूनंतर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी. शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व कोल्हे परिवार स्व. कोल्हेसाहेबांचा वारसा नेटाने चालवत आहे. स्व. कोल्हेसाहेबांनी आत्मा मालिक ध्यानपीठाला कायमच सहकार्य केले आणि आताही कोल्हे परिवाराकडून सहकार्य मिळत आहे, असे संत परमानंद महाराज यांनी आवर्जून सांगितले. चैत्र महोत्सवानिमित आयोजित कार्यक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज, कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज, ज्येष्ठ संत विवेकानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज, संत सर्वेशानंद महाराज, ज्येष्ठ संत शांती माई, सकल संतपीठ, तसेच प्रमुख विश्वस्त कमलाताई मधुकर पिचड व सुरेखा दिलीप मोहिते पाटील यांच्यासह विश्वस्त मंडळ, शिक्षक व भाविक-भक्त व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विविध जिल्ह्यातून,शहरातून, तालुक्यातून आलेल्या तसेच परदेशी भाविकांची संख्या देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती.