कोपरगाव येथे नवीन क्रीडा विद्यापीठ उभारावे, स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात क्रीडा क्षेत्रासाठी अनुकूल वातावरण, भौतिक सुविधा व दळणवळणाची व्यवस्था उपलब्ध आहे. खेळाडूंच्या कलागुणांना चालना व क्रीडा विषयक दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी कोपरगाव येथे नवीन क्रीडा विद्यापीठाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

स्नेहलताताई कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मुंबई ते नागपूर हा समृध्दी महामार्ग, शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्री साईबाबा देवस्थान, काकडी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोपरगाव रेल्वेस्थानक व अद्ययावत बसस्थानक असल्यामुळे दळणवळणाची अतिशय उत्तम सुविधा आहे. त्याचप्रमाणे कोपरगाव मतदारसंघात नावाजलेल्या खेळाडूंची व क्रीडापटूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

या भागातील अनेक खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये विभागीय, राज्य, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर नेत्रदीपक कामगिरी बजावून मोठे यश संपादन केलेले आहे. तसेच शिक्षणाचे माहेरघर म्हणून कोपरगावचा नावलौकिक आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रकुल आशियायी स्पर्धा व अन्य क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या देशाला अधिकाधिक चांगले खेळाडू मिळावेत, यासाठी अनुकूल वातावरण व भौतिक सोयी-सुविधा आमच्या कोपरगाव मतदारसंघात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात क्रीडा विद्यापीठ उभारल्यास ग्रामीण भागातील खेळाडूंची निवास आणि प्रवासाची व्यवस्था उत्तम होईल, क्रीडा प्रशिक्षक व दूर अंतरावरील मान्यवर येण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून कोपरगाव मतदारसंघ उचित राहील.

तसेच विविध क्रीडा प्रकारांचे अभ्यासक्रम व प्रशिक्षण व खेळांबरोबरच विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी खेळाडू व क्रीडा क्षेत्राशी संबंधित लोकांना मिळेल. खेळाडूंना स्पोर्ट्स मॅनेजमेंट, स्पोर्ट्स इव्हेंट, फिजिओ, अॅकॅडमीक अशा अनेक गोष्टी क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध होतील. साहजिकच क्रीडा विद्यापीठामुळे क्रीडा क्षेत्रासह कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार आहे

सध्याच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मैदानी खेळ प्राणवायू पुरविण्याचे काम करतात. वाढत्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण पाहता प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी मैदानी खेळांचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. आजच्या तरुण पिढीला मोबाईलचा अतिवापर व वेगवेगळ्या व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी आधुनिक शिक्षणाबरोबरच खेळांविषयी आवड निर्माण करून त्यांना आवडीच्या खेळामध्ये भवितव्य घडविण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने या भागात क्रीडा विद्यापीठाची निर्मिती करणे गरजेचे आहे.

क्रीडा विद्यापीठामुळे खेळाडू, प्रशिक्षकांबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करणाऱ्या युवा पिढीसाठी हे मोठे दालन ठरणार आहे. क्रीडा विद्यापीठामुळे खेळाडूंना मोठा फायदा होईल. तसेच स्थानिक पातळीवर मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकेल. नवीन क्रीडा विद्यापीठ कोपरगाव येथे व्हावे, अशी खेळाडूंची मागणी आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने नूतन क्रीडा विद्यापीठ कोपरगाव मतदारसंघात उभारण्यासाठी संबंधित कार्यान्वित यंत्रणेस आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे या निवेदनाद्रारे केली आहे.