कोपरगावमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : कोपरगाव शहरातील मध्यवस्तीत धुमाकूळ घालणारा बिबट्या मंगळवारी सायंकाळी पाच वाजता जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेची अधिक माहिती देताना कोपरगाव वनविभागाच्या परीक्षेञाधिकारी प्रतिभा सोनवणे म्हणाल्या की, भक्षाच्या शोधात बिबट्या कोपरगाव शहरातील सर्वात जास्त कुञे असल्याने चामडे बाजार परिसरात आला होता. तेथील दोन कुत्र्यांचा फडशा पाडून ढाराढूर झालेल्या बिबट्याने शहरातुन बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, माञ तो रस्ता भरकटला तसेच नागरिकांची त्याच्यावर नजर पडताच तो नागरीवस्तीत व शहराच्या मुख्य रस्त्यावरुन फिरु लागला.

 बिबट्या मादी ही गोदर असावी तसेच भक्ष जास्त खाल्ल्याने ती सुस्तावली होती. जंगल परिसर कमी झाल्याने वन्य जीवांना लपून बसण्यासाठी जागा नाही. तसेच तालुक्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढून ती पाचशे पेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे तालुक्यात बहुतांश ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून येतोय. तेव्हा नागरिकांनी बिबट्या दिसला तरी त्याला इजा न करता वनविभागाला कळवावे अशी माहिती वन परिक्षेञ अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनी दिली. 

बिबट्याने दोन कुञे खाल्ल्यामुळे त्याच्या पोटाचा भाग फुगल्याने त्याला सुस्ती आली होती, अशातच नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरु केला. कोणी त्याला दगड मारत होते तर कोणी त्याच्या समोर जावून त्याला हत्याराने मारण्याचा प्रयत्न करीत होते. काही तरुण तर हातातल्या मोबाईलमध्ये चिञीकरण करण्यात दंग होते.

अखेर या घटनेची माहिती वनविभागाला समजताच तातडीने विशेष पथकाला घटनास्थळी पाचारण करुन पिंजरा लावण्यात आला. माञ बिबट्या पिंजऱ्यात सापडत नसल्याने वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी यांनी राञभर बिबट्यावर पाळत ठेवून राञ जागुन काढली.  अखेर संगमनेर येथुन रॅपिड रेसक्यु पथकाला पाचारण केले.

मंगळवारी दिवसभर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह १५ पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने वनरक्षक श्रध्दा पडवळ (मेहेरखांब), बी. एस. गाडे, रवि भोंगे, संगमनेरचे वनरक्षक जोजार भाऊसाहेब, संतोष पारधी, सुहास उपासने, सातपुते आदींनी नागरीकांच्या मदतीने मंगळवारी सायंकाळी शहरातील खंदकनाला परिसराजवळील डॉ. उंबरकर हाॅस्पिटल समोरच्या एका काटवणातून बिबट्याला मोठ्या शर्थीच्या प्रयत्नाने जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले. 

दरम्यान कोपरगाव शहरात बिबट्याने धुमाकूळ घालत असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच बिबट्या दडून बसलेल्या ठिकाणी आमदार आशुतोष काळे यांनी प्रत्यक्षात भेट देवून परिस्थितीची माहीती घेवून वनविभाग व पोलीस प्रशासनाला योग्य त्या सुचना देवुन बिबट्या जेर बंद झाल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेले. 

 राञभर बिबट्या शहरात फिरत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी सोशल मीडियावर आलेले व्हिडिओ बघून एकमेकांना विचारपूस करीत काळजी घेण्यास सांगत होते. बिबट्या राञभर संजयनगर, सुभाषनगर, बैलबाजार रोड, आयशा काॅलनी, चमडेबाजारसह बसस्थानक परिसरात फिरत होता. तर नागरीक त्याला हुसकावण्यासाठी दगड मारत होते तर कोणी धारधार शस्त्र घेवून त्यांच्या समोर जात होते. सोमवारची राञ व मंगळवारचा संपूर्ण दिवस कोपरगावचे नागरिकांनी बिबट्याच्या अवतीभोवती तोबा गर्दी केली होती. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होताच नागरिकांनी घरचा रस्ता धरला.