सामाजिक दायित्वाच्या भावनेने चालते रेणुका मल्टीस्टेटचे कार्य – डॉ. भालेराव

शेवगाव प्रतिनिधी, दि.२४ : रेणुकामाता मल्टीस्टेट संस्था सामाजिक उत्तर दायित्वाच्या भावनेतून अनेक कार्यात नियमितपणे  सहभाग घेत असते. संस्था गरजू आणि पात्र अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देखील करत असते. त्याचाच भाग म्हणून येथील उचल फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व आपण स्विकारात असल्याचे प्रतिपादन रेणुकामाता मल्टीस्टेटचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत नाना भालेराव यांनी केले.

      शुक्रवारी (दि २३ ) उचल फाउंडेशनच्या प्रांगणात स्व. रामकिसन लढ्ढा यांच्या १२ व्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या वास्तूचे लोकार्पण डॉ. प्रशांत नाना भालेराव यांच्या  हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुनील आढाव होते. यावेळी मंचावर स्नेहलता लबडे, डॉ. संजय लढ्ढा, डॉ. मनिषा लढ्ढा, उपस्थित होत्या.

     यावेळी  डॉ. संजय लढ्ढा यांनी उचल फाउंडेशनची पुढील दिशा, ध्येय व उद्दिष्ट स्पष्ट करुन संस्थेच्या पुढील विस्तारित मुलींच्या वस्तीगृहासाठी स्वतःच्या मालकीचा सुमारे एक एकर भूखंड देण्याचे जाहीर केले.

       प्रा. आढाव म्हणाले समाजातील गरजु, दुर्लक्षितांवर लक्ष केंद्रीत करून आधार देण्याचे महान कार्य उचल फाउंडेशनचे सचिन खेडकर करत आहेत. आपण आपल्या सामाजिक जाणिवा जपून समाजातील गरजू ,वंचित, निराश्रित बांधवांना नेहमीच मदतीचा हात द्यावा. या संस्थेचे कार्य अत्यंत स्पृहनीय असल्याने ती अल्पावधीतच  नावारूपाला आली आहे.     

शेवगावात पाच वर्षांपासून उचल फाउंडेशन या संस्थेने ऊस तोडणी कामगार, एकलपालक, अनाथ व वंचित बालकांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचे कार्य सुरू केले. दोन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या प्रकल्पात सद्यस्थितीत निवासी २५ मुले  शिक्षण घेत आहेत. संस्थेची गरज ओळखून लढ्ढा कुटूबियांनी स्व. रामकिसन लढ्ढा यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुमारे ८०० स्क्वेअर फुटाचा हॉल बांधून दिला आहे.

       यावेळी काही  उपस्थितांनी उपयोगी वस्तु  व  रोख स्वरूपातही मदत केली. यावेळी सर्व लड्डा परिवार, इनरव्हील व रोटरी परिवार, गोविंदा ग्रुप,  डॉ. आशिष लाहोटी  डॉ. मयूर लांडे, डॉ. कृष्णा देहाडराय, गणेश रांधवणे, बंडू रासने, संजय फडके, वल्लभ लोहिया, सोपान आधाट  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किसनराव माने  यांनी केले. तर  डॉ. मनीषा लढ्ढा यांनी आभार व्यक्त केले.