कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील वयोवृद्ध नागरिकांचे प्रकरणे गेल्या सहा ते सात महिन्यापासून प्रलंबित असून तालुक्यातील एकही प्रकरण मंजूर झालेले नाही यामुळे वयोवृद्ध नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे मुख्यमंत्री, महसूलमंत्री,जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी,तहसीलदार यांनी लक्ष देऊन हे सर्व प्रलंबित असणारे प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाला तात्काळ सूचना देऊन सहकार्य करावे अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोपरगावच्या स्नेहलता कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोपरगाव तालुक्यातील शेकडो गरजवंत वयोवृद्ध नागरिकांनी संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेतील वैयक्तिक दाखल केलल्या प्रकरणांची कोपरगाव तहसील कार्यालयात कामे होत नसल्यामुळे या दोन्ही योजनेतील शेकडो वयोवृद्ध नागरिकांचे ६ ते ७ महिन्यापासून एकही प्रकरण मंजूर झाले नाही.

यामुळे वयोवृद्ध नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात यामुळे त्यांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होत आहे परंतु तहसील कार्यालयात आल्यास कोणतेही काम झालेले दिसत नाही आमच्या कार्यालयामध्ये येऊन वारंवार चौकशी करावी लागते.या प्रलंबित असलेल्या प्रकरणा संदर्भात तहसील कार्यालयातील संबंधित विभागाशी संपर्क केल्यास दस्तावेजांच्या संदर्भात कुठलीही मीटिंग न झाल्याचे उत्तर मिळते.मागील सहा ते सात महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील एकही प्रकरण तहसील कार्यालयाने मंजूर केलेले नसून अनेक फायली कार्यालयात धुळखात पडलेल्या आहेत.

कोपरगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेमधील शकडो प्रकरणे तातडीने निकाली काढणे गरजेचे असतानाही एकाही प्रकरणावर सुनवाई झाली नसल्याचे चित्र दिसत आहे.ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.तहसील कार्यालयात शेकडो फाईली तश्याच पडून आहेत यामुळे वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी यात लक्ष घालून तहसील कार्यालयात संबंधित विभागातील शासकीय अधिकाऱ्यांना योग्य आदेश देण्याची मागणी स्नेहलता कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.


