शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : पंचायत समितीने यंदाच्या उन्हाळ्यासाठी टंचाई आराखड्यात पिण्याच्या पाण्यावर सुमारे १३ लाख रुपये खर्च गृहीत धरुन तालुक्यातील नागलवाडी व सोनविहीर या दोन गावांसाठी टॅकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आल्यास एक टॅंकर उपलब्ध करण्यात येवून त्यासाठी सुमारे ७ लाख रुपयांचा खर्च तसेच तालुक्यातील सोनविहीर, नागलवाडी, सेवानगर तांडा गावठान, गोळेगाव व सोनेसांगवी अशा सहा ठिकाणी खाजगी विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव केला आहे.
त्यासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च तसेच शेवगाव, राक्षी व चापडगाव येथील उद्भवातून पाणी उचलून प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून समाविष्ट गावात पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी सुमारे १ लाख ७५ हजार असा एकूण १३ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
सध्या पहाटे गारवा, तर दुपारी काही प्रमाणात उन्हाच्या झळा व संध्याकाळी पुन्हा गारठा असे दुहेरी वातावरण असते. त्यामुळे हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून पंचायत समितीच्या टंचाई विभागाने पाणी टंचाईचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पुढे पाठविला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून तालुक्यात प्रर्जन्यमान बऱ्या पैकी राहिल्याने पिण्याच्या पाण्याच्या सर्वच स्तोस्त्रात बऱ्या पैकी पाणी साठा उपलब्ध असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात सहसा पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता कमी आहे.
पाच वर्षापूर्वी तालुक्यातील टंचाईग्रस्त ५२ गावात ६९ टॅंकर द्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागला व त्यासाठी शासनाच्या तिजोरीतून सुमारे १० ते ११ कोटी रुपये खर्ची पडले. मात्र सन २०२०-२०२१ व त्यापाठोपाठ व २०२१-२०२२ मध्ये टेंकर संख्या निरंक राहिली आहे. या काळात तालुक्यात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी राहिल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. गावागावात बंद असणारे हातपंप व विहिरी पुनरजीवित झाल्या. नदीवरील विविध बंधारे तुडुंब भरले. शासनाच्या जलजीवन योजनेतून तालुक्यात विविध ठिकाणी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना झाल्या.
तालुक्याची जीवन रेखा म्हणून ओळख असलेल्या जायकवाडी जलाशयात जवळपास १०० टक्के पाणी साठा उपलब्ध झाल्याने तालुक्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या तालुक्यातील लाभ धारक गावांना मुबलक पाणी मिळत राहिल्याने पिण्याच्या पाण्याची अडचण कमी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठ्यासाठी पूर्वी शासकीय तिजोरीवर पडणारा कोट्यावाधीचा खर्च आता काही लाखावर येणार आहे. एकांदरीत शासन, प्रशासन व विविध स्तरावरील लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही हे तालुका पंचायत समितीच्या टंचाई आराखड्यातून स्पष्ट होत आहे.
तालुक्यात सन २०१५ -१६ – टंचाई ग्रस्त ५२ गावे, ६९ टॅकर, खर्च सुमारे १० कोटी ,
सन २०१६-१७ टंचाईग्रस्त ६ गावे, ९ टँकर खर्च ९ लाख
सन २०१८-२०१९ टंचाईग्रस्त ५० गावे, ६९ टॅकर खर्च १२ कोटी
२०१९-२०२० टंचाईग्रस्त ३ गावे, ४ टॅकर, खर्च ७ लाख.
सन २०१७-१८, २०२०-२०२१ व २०२१-२२ मध्ये एकाही गावात पाण्याची टंचाई नव्हती, टँकर संख्या निरंक