स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०५ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्नेहलता, बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिला-भगिनींसाठी संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने कोपरगाव शहरात येत्या ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर आणि बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांच्या ‘न्यू होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून गृहिणींना, माता-भगिनींना काही आनंदाचे क्षण मिळावे, त्यांच्या कल्पक बुद्धीला चालना व सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाने माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात प्रथमच ‘न्यू होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता कोपरगाव येथील तहसिल कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मैदानात हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर व टीव्ही स्टार बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या संगीतमय कार्यक्रमात गप्पा-गोष्टीबरोबरच उखाणे, तळ्यात मळ्यात व इतर विविध मनोरंजक खेळ, फुगा फोडण्याची स्पर्धा, प्रश्नमंजुषा, गीत, नृत्य, विनोद अशी भरगच्च मेजवानी असणार आहे. या कार्यक्रमात सर्व वयोगटातील महिलांना मोफत प्रवेश राहणार असून, कार्यक्रमस्थळी उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.

त्यातील भाग्यवान विजेत्यांसाठी पहिले बक्षीस फ्रीज, दुसरे बक्षीस वॉशिंग मशीन, तिसरे बक्षीस मायक्रो ओव्हन, चौथे बक्षीस एलईडी टीव्ही आणि पाचवे बक्षीस मिक्सर अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कोपरगावात पहिल्यांदाच होणाऱ्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून, या कार्यक्रमाविषयी महिला वर्गात मोठी उत्सुकता व चर्चा आहे. 

या कार्यक्रमात कोपरगाव शहर व परिसरातील जास्तीतजास्त महिला, माता-भगिनींनी सहभागी व्हावे. तसेच अधिक माहितीसाठी ८१८१९०९०९० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन संयोजक संजीवनी महिला स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या वतीने करण्यात आले आहे.