पालखेड डावा कालव्यातून दोन दिवसात पाणी मिळणार – स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०५ : पावसाअभावी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पालखेड डावा कालव्यातून दहेगाव बोलका, पढेगाव, कासली, उक्कडगाव, तिळवणी, शिरसगाव, सावळगाव, करंजी, ओगदी, आपेगाव, गोधेगाव या गावांसाठी चारी नंबर ४५ व ५२ मध्ये पाणी सोडून कोळ नदीवरील बंधारे भरून द्यावेत.

तसेच बोलकी, आंचलगाव, शिंगणापूर या गावांसाठी नारंदी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यावर फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पालखेड डावा कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले असून, पूर्व भागात येत्या दोन दिवसांत पालखेड डावा कालव्याचे पाणी सोडण्यात येणार आहे. 

यंदा पावसाळा संपत आला तरी कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील सर्वच पिके वाया गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यात कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पाण्याअभावी नागरिकांचे व शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.पूर्व भागातील दहेगाव बोलका, पढेगाव, कासली, उक्कडगाव, तिळवणी, शिरसगाव, सावळगाव, करंजी, ओगदी, आपेगाव, गोधेगाव बोलकी, आंचलगाव, शिंगणापूर, आंचलगाव, बोलकी, शिंगणापूर आदी गावांना पालखेड डावा कालव्यातून पाणीपुरवठा होतो.

शिरसगाव, सावळगाव, तिळवणी, आपेगाव, गोधेगाव या गावांच्या पाणीपुरवठा करण्यासाठी कोळ नदीवर बंधारे बांधण्यात आले असून, पालखेड डावा कालव्यातून या बंधाऱ्यात पाणी सोडल्यानंतरच या गावातील लोकांना पाणी मिळते. पालखेड डावा कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरच पूर्व भागातील नागरिकांची तहान भागते. तसेच या भागातील शेतकरी या कालव्याच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. सद्य:स्थितीत या भागातील विहिरी कोरड्याठाक असून शेतीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. या भागातील जनतेसाठी पाण्याचा दुसरा कोणताही स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे पालखेड डावा कालव्यातून तात्काळ पाणी सोडून या भागातील बंधारे व पाझर तलाव भरून द्यावेत, अशी मागणी पूर्व भागातील शेतकऱ्यांनी माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांच्याकडे केली होती. 

स्नेहलता कोल्हे यांनी तातडीने उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे पाण्याअभावी हाल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले व पालखेड डावा कालव्यातून पूर्व भागात त्वरित पाणी सोडण्याची मागणी त्यांच्याकडे केली. तसेच त्यांनी कार्यकारी अभियंता भागवत यांच्याशीही संपर्क साधून पाणी सोडण्याची मागणी केली.

स्नेहलता कोल्हे यांच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पालखेड डावा कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन दिवसांत पालखेड डावा कालव्यातून दहेगाव बोलका, पढेगाव, कासली, उक्कडगाव, तिळवणी, शिरसगाव, सावळगाव, करंजी, ओगदी, आपेगाव, गोधेगाव या गावांसाठी चारी नंबर ४५ व ५२ मध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर आंचलगाव, बोलकी, शिंगणापूर येथील नारंदी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातदेखील पालखेड डावा कालव्यातून पाणी सोडण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता भागवत यांनी सांगितले.