भ्रष्टाचाराने माखलेल्या रस्त्याने घेतला चिमुकल्याचा बळी – तुकाराम गव्हाणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : संगमनेर मार्गावरील निकृष्ट व भ्रष्टाचाराने माखलेल्या रस्त्याने अखेर एका निष्पाप चिमुकल्याचा दुर्दैवी बळी गेला असून, अंजनापूर येथील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. दहा कोटी रुपयांच्या कथित निधीचा चुराडा करत संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे का? असा संतप्त सवाल आज परिसरात उपस्थित केला जात आहे. या रस्त्यासाठी झालेल्या आजवरच्या भ्रष्टाचाराने रक्तरंजीत प्रवास रोज जनतेला करावा लागत आहे असा संताप तुकाराम गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.

दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी व कामगार या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र रस्त्यावरील प्रचंड खड्डे, अपूर्ण दुरुस्ती व निष्काळजी कारभार यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. शाळेत जाणाऱ्या दोन भावंडांची सायकल रस्त्यातील खोल खड्ड्यातील निखळलेल्या दगडावरून घसरली त्याला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने एका निष्पाप विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात नसून व्यवस्थेने केलेला खून आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ठिय्या करत रास्तारोको केला होता. जर निस्वार्थपणे प्रामाणिक काम उपलब्ध निधीत आधीच झाले असते तर आज नाहक बळी गेला नसता. लोकप्रतिनिधी जनतेसाठी असतात की फक्त निवडणुकीपुरते, असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांचे प्राण मोलाचे नाहीत का, असा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे.

एकीकडे हजारो कोटींच्या विकासाच्या घोषणा केल्या जातात, तर दुसरीकडे मूलभूत रस्त्यांवर निष्पाप जीव जात असतील तर अशा विकासाचा उपयोग काय, असा रोष व्यक्त होत आहे. दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने त्वरित पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.निष्पाप चिमुकल्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा हीच परिसरातील जनतेची ठाम मागणी आहे.

Leave a Reply