कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील थकीत मालमत्ता करावरील शास्ती (दंड) १०० टक्के माफ करण्यात यावी या बाबत आ. आशुतोष काळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्या बाबत पुढे पाऊल उचलून कोपरगावकरांना कर वसुली प्रोत्साहनात्मक अभय योजना अंतर्गत शास्ती (दंड) १०० टक्के माफ करण्यात यावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे कि, सर्व सामान्य नागरीकांवर करचा अतिरिक्त बोजा पडू नये व नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या दुहेरी उद्देशातून महायुती शासनाने थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारा दोन टक्के दंड (शास्ती) माफ करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या बाबत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला मागील वर्षी २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्या पाठपुराव्यातून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्या बाबत आ.आशुतोष काळे यांनी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन कर वसुली प्रोत्साहनात्मक अभय योजना अंतर्गत कोपरगावकरांचा शास्ती (दंड) माफ करावी अशी मागणी राज्याचे नगरविकासमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

पाच नंबर साठवण तलावाच्या कामासाठी १३१.२४ कोटी निधी राज्यशासनाकडून मिळवण्यासाठी एकूण मिळणाऱ्या निधी पैकी १५ टक्के रक्कम कोपरगाव नगरपरिषदेने महाराष्ट्र शासनाकडे भरणे अनिवार्य होते. हि रक्कम कोपरगाव नगरपरिषदेच्या तिजोरीतून अर्थातच कोपरगावकरांच्या खिशातून जाऊन त्यांचा भार कोपरगावकरांवर पडणार होता. परंतु त्यावेळी देखील आ. आशुतोष काळे यांनी हि १५ टक्के रक्कम महायुती शासनाकडून माफ करून घेत कोपरगावकरांवर पडणारा जवळपास २० कोटींचा बोजा वाचवला आहे. आजही कोपरगावकरांना दंड (शास्ती) माफ करण्यासाठी आ. आशुतोष काळे करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे कोपरगावकर सुखावले आहे.


