कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येत योग्य निर्णय घेतला असून योग्य व्यक्तींना योग्य जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘विश्वासनामा’ची पूर्तता करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून महिलांना सभापती पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महिला सक्षम असून त्या कोणतेही कार्य चिकाटीने पूर्ण करतात. अनेक वर्षांपासून कोल्हे परिवार महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे.नगरपालिकेतील सहा महत्त्वाच्या समित्यांपैकी पाच समित्यांवर ‘लाडक्या बहिणींना’ सभापतीपदी नियुक्त करण्यात आले आहे,असे प्रतिपादन संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांनी केले.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदाचा पदग्रहण समारंभ गुरुवारी (दि.१२) माधवराव कच्चेश्वर आढाव विद्यालय, कोपरगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सविता कैलास मंजुळ यांची सभापतीपदी तर मनीषा दत्तू पगारे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमास नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांच्यासह नगरसेवक, सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राजमाता जिजाऊ साहेब तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कोल्हे पुढे म्हणाल्या, कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत कोल्हे परिवार, भाजपा-आरपीआय मित्र पक्ष यांच्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने उमेदवारांना निवडून दिले. युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पराग संधान व सर्व नवनिर्वाचित सदस्य शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व्हिजनवर काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विश्वासनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण केली जातील आणि कोपरगावच्या प्रगतीची ही सुरुवात असून ती थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहरात पाणी, रस्ते, महिला सुरक्षा, स्वच्छता अशा अनेक मूलभूत समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. महिला नगरसेविकांना मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून शहरातील माता-भगिनींपर्यंत शासकीय योजना व मदत पोहोचवण्याचे काम महिला व बालकल्याण समितीमार्फत केले जाणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या माध्यमातून मा. आ. स्नेहलताताई कोल्हे महिला सशक्तिकरणाचे कार्य करत आहेत. तालुक्यातील सुमारे ३० हजार महिलांचे संघटन बचत गटांच्या माध्यमातून उभे राहिले असून ही चळवळ राज्यभर आदर्श मानली जाते, असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी गटनेते प्रसाद आढाव, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, विनोद राक्षे, कैलास मंजुळ, दत्तू पगारे, नगरसेविका निलोफर पठाण व महिला बचत गटातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


