कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ एप्रिल २०२६ : युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आता थांबायचं नाही या विचाराने संपूर्ण शहराचा विकास सुरू आहे. गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून प्रशासक काळात बंद पडलेली कामे आता पुन्हा मोठ्या जोमात सुरू करत आहोत. मोठ्या जल्लोषात लोकप्रतिनिधी यांनी दोन वर्षांपूर्वी पाच नंबर साठवण तलावाचे उद्घाटन केले होते. प्रत्यक्षात त्या योजनेचे पाणी शहराला अद्यापही मिळालेले नाही. पाण्याच्या टाक्याही तयार होत्या, परंतु प्रशासन किंवा लोकप्रतिनिधिंना त्या सुरू करण्यामध्ये कुठलाही रस नव्हता.

मात्र सत्तातंर झाल्यानंतर ही सर्व कामे सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले, नगराध्यक्ष पराग संधान व सर्व नगरसेवकांनी विविध कामांना गती दिली. विरोधकांनी मात्र केवळ आजवर खोटी पाठ थोपटून घेण्यात रस होता हे सिद्ध झाले आहे. कारण आम्ही काम करून जनतेला चांगले पाणी देण्याचा यशस्वी प्रयत्न करतो आहे. हे शहराने पाहिले आहे अशी प्रतिक्रिया पाणी पुरवठा सभापती वैशाली वाजे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर परिसरामध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पाण्याच्या टाकी व पाईपलाईनची यशस्वी चाचणी नगराध्यक्ष पराग संधान यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी 11 एप्रिल रोजी पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, पाणीपुरवठा सभापती वैशाली वाजे, मनोज अग्रवाल, राजेंद्र सोनवणे, अमोल अजमेरे, कैलास मंजूळ, रवींद्र कथले, संजय उदावंत, दत्तू पगारे, संतोष शिंदे, फिरोज पठाण, अविनाश पाठक, दीपक जपे, राहुल खरात, निसार शेख, कैलास सोमासे, शैलेश नागरे, महेश पवार, पंकज शिंदे, स्वराज सूर्यवंशी, गणेश कांदळकर, संदीप कडू तसेच ब्रिजलाल नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष पराग संधान पुढे म्हणाले की, पाणीपुरवठा समितीच्या सभापती वैशाली वाजे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. त्याच प्रयत्नांच्या परिणामी आज ब्रिजलाल नगर भागातील पाण्याच्या टाकीचे मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. यामुळे येथील स्थानिक नागरिकांना नळजोडणीद्वारे पाणी उपलब्ध होणार आहे.

तसेच या उपक्रमासाठी ब्रिजलाल नगरचे सर्वेसर्वा मनोजशेठ अग्रवाल यांचे आम्ही कायम ऋणी आहोत. त्यांनी या पाण्याच्या टाकीसाठी दहा गुंठे जागा उपलब्ध करून देत मोठी मदत केली आहे. त्यामुळे ब्रिजलालनगर, जोशी नगर, श्रद्धानगरी, शंकरनगर, माधव नगर आणि बोरावके वस्ती या सर्व भागांतील नागरिकांना या नव्या पाण्याच्या टाकीमुळे चांगल्या दाबाने पाणी मिळणार आहे.

आपण सर्वजण पाहत आहात की, गेल्या दोन महिन्यांमध्ये काही सुधारणा करून शहरवासीयांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसांत फिल्टरेशनचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यामध्ये डोसिंग पंप, क्लोरीनेशन आदी कामे नियमितपणे सुरू केल्यानंतर शहरवासीयांना अधिक दर्जेदार पाणीपुरवठा होईल. तसेच मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाच नंबर तलावाच्या कामाचा विरोधकांकडून यापूर्वी फक्त गाजावाजा झाला होता, परंतु त्याचा नागरिकांना प्रत्यक्षात उपयोग होत नव्हता.

या तलावाच्या अंतर्गत शहरात टाकण्यात आलेल्या ९५ कि.मी. पाईपलाईनची तपासणी आम्ही स्वतः करणार आहोत. याबाबत संबंधित कंत्राटदाराशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या पाईपलाईनची योग्य जोडणी करण्यात आलेली नसून, ती पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच नवीन चार पाण्याच्या टाक्या आणि एक मुख्य टाकी (एमबीआर) कार्यान्वित करून शहरातील सर्व नागरिकांना चांगल्या दाबाने पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी सांगितले.

कोपरगावच्या मा.आ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मोठी मदत झाली आहे. महिलांना रात्री उशिरा पाणी भरण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत पाणीपुरवठा बंद करून दिवसा इतर वेळेत पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत ही योजना सुरू होईल, ज्यामुळे महिलांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे – पराग संधान, नगराध्यक्ष


