कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव नगरपरिषद कार्यक्षेत्रात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना होणारा त्रास, वाहतुकीतील अडथळे तसेच अपघातांचा धोका लक्षात घेऊन कोपरगाव नगरपरिषदेने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गोप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वतःची गोशाळा उभारण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला असून, या गोशाळेच्या कामाला दि. १८ ऑगस्ट २०२६ पासून प्रत्यक्ष सुरुवात होत आहे.

नगरपरिषद प्रशासनाने यापूर्वी शहरातील मोकाट जनावरांना पकडून त्यांची विविध गोशाळांमध्ये व्यवस्था केली होती. मात्र, अनेक गोशाळांमध्ये जागा उपलब्ध नसल्याने आता पकडलेली जनावरे स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. दुसरीकडे नगरपरिषदेने मोकाट जनावरांच्या व्यवस्थापनासाठी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी आणि स्थानिक पातळीवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेने स्वतःची गोशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या कामाची प्राथमिक सुरुवात जागेची लेव्हलिंग, साफसफाई व आवश्यक पूर्वतयारीच्या कामांपासून करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष पराग संधान यांच्या उपस्थितीत तसेच सर्व सभापती, नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.

मोकाट जनावरांचा प्रश्न केवळ जनावरांच्या व्यवस्थापनापुरता मर्यादित नसून तो नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि शहराच्या स्वच्छतेशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे नगरपरिषदेचा हा निर्णय शहराच्या दृष्टीने निश्चितच स्वागतार्ह आहे.नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत मोकाट जनावरांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने कोपरगाव नगरपरिषदेने उचललेले हे पाऊल शहरासाठी निश्चितच समाधानकारक आणि अनुकरणीय ठरणार आहे.


